भिवंडी अग्निशमन दलाची अवस्था ही सध्याच्या घडीला अतिशय बिकट आहे. शहराची एकूणच वाढती लोकसंख्या पाहता शहरात सोयी सुविधा मात्र अतिशय त्रोटक असल्याचे लक्षात येत आहे. भिवंडीमध्ये प्रामुख्याने महापालिका क्षेत्रामध्ये केमिकल गोदामे, मोती बनविण्याचे कारखाने, यंत्रमाग कारखाने आहेत. त्यामुळेच या गोदामांना आगी लागण्याचे प्रकार अगदी वरचेवर घडत असतात. असे असतानाही भिवंडी अग्निशमन दलामध्ये मात्र पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. शिवाय भरीस भर म्हणजे आग विझविण्यासाठी लागणारे बंबही पुरेसे नाहीत. केवळ चारच बंब असून, यातील दोन बंब हे नादुरूस्त अवस्थेत आहेत.
भिवंडीमध्ये ग्रामीण भागात तब्बल ५० हजारांहून अधिक गोदामे आहेत. त्यामुळेच शहरामध्ये किमान दहा बंब असणे आवश्यक होते. असे असताना केवळ चारच बंब आहेत, त्यामुळे आग लागल्यावर अग्निशमन दलाची अक्षरशः तारेवरची कसरत होते. या महापालिका क्षेत्रामध्ये चार अग्निशमन केंद्रे आहेत. मुख्य अग्निशमन दलाची इमारत धोकादायक आहे या कारणास्तव ही इमारत कोंबडपाडा येथील केंद्र व अंजूरफाटा येथील जुन्या जकातनाक्यावर सुरु केली आहे. या केंद्रांमध्येही सुख सुविधांचे तीन तेराच वाजले आहेत.
हे ही वाचा:
जे जे इन्स्टिट्यूटमधून गायब झाले कॅमेरे, महागड्या लेन्स
मुकेश अंबानी यांचे ७-इलेव्हन लवकरच मुंबईत
आर्यन खान आता एक रात्र राहणार एनसीबी कोठडीत
मार्शल्सचा मुजोरपणा थांबण्याचे नाव घेईना!
सध्याच्या घडीला अग्निशमन दलामध्ये ४९ फायरमन, १७ चालक, पाच लिपिक, एक शिपाई असा ७३ कर्मचारीपट आहे. परंतु कर्मचारी वर्गाला बेसिक सुविधाही मिळणे दुरापास्त झालेले आहे. अग्निशमन कर्मचारी वर्गाला साधे गणवेशही इथे उपलब्ध नाहीत. केवळ इतकेच नाही तर, पालिकेकडे असणारे ४ बंब हे सुद्धा अपुरे आहेतच. शिवाय या चारपैकी दोन बंब हे बंद पडलेले आहेत. त्यामुळे आयत्यावेळी लागणारी आगीच्या ठिकाणी पोहोचणे हे खूपच जिकीरीचे बनलेले आहे. त्यामुळे वित्तहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे.