बनावट वेबसाईटवरुन तुळजाभवानी देवीच्या भाविकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी चार वेबसाईट चालकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेबसाईटवरुन भक्तांची आर्थिक लूट करण्यात येत होती.
तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तुळजाभवानी देवीच्या नावाने बोगस वेबसाईट बनवून विविध पूजा आणि विधी करण्याच्या बहाण्याने भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या चार वेबसाईटच्या चालकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
इटलीच्या दौऱ्यात पुन्हा मोदी-बायडेन भेट
मुंबई- नाशिक महामार्गावरून जप्त केला ३५.९० किलो गांजा!
ICC Men’s T20 WC: आज कोणाला ‘मौका’?
भाजपा ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत प्रतिक कर्पे
तुळजाभवानी मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट www.shrituljabhavani.org ही असताना बोगस वेबसाईट तयार करुन काही मंडळी भाविकांकडुन देवीच्या विविध पूजा आणि विधी करण्याच्या नावाखाली आर्थिक रक्कम ऑनलाईन घेत होते. अज्ञात लोकांनी www.tuljabhawanipujari.com, www.tuljabhwanimandir.org, www.shrituljabhavani.com, wwww.epuja.co.in या चार वेबसाईट सुरु करुन भाविकांची लूट केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा सर्व प्रकार तुळजाभवानी नवरात्र काळात राजरोस सुरु होता. या बोगस वेबसाईटवरुन तुळजाभवानी देवीचा अभिषेक, अलंकार महापूजा, खण- नारळ ओटी पूजा, जागरण गोंधळ, अन्नदान अशा विविध पूजा करण्याचे अमिश दाखवुन ऑनलाईन पैसे जमा करून घेतले जात होते. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम ४२० फसवणूक, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६६ सी आणि डी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ज्या भक्तांनी यासह अन्य बोगस वेबसाईटवर दिलेल्या आमिषाला बळी पडून पूजा आणि विधीसाठी पैसे ट्रान्सफर केले आहेत त्यांनी मंदिर संस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.