पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी लष्करी तळावर झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता, त्या प्रकरणी एका जवानाला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात भटिंडा पोलिस पत्रकार परिषदेत अधिकृत माहिती देणार आहेत.
भटिंडा येथील लष्करी तळावर भल्या सकाळी ही गोळीबाराची घटना घडली होती. पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या दोघांनी पांढरा कुर्ता आणि पायजमा घातल्याची माहिती आली होती समोर. त्यांच्याकडे रायफल आणि कुऱ्हाड असल्याचेही आढळले होते.
ऑफिसर्स मेसच्या मागे असलेल्या बराकीत हे जवान झोपले होते त्यावेळी हा गोळीबार झाला. त्यात चार जवान मृत्यूमुखी पडले होते. पहाटे ४.३५ वाजता ही घटना घडली होती. या घटनेमागे दहशतवादाचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोलिसांनी ती शक्यता फेटाळून लावली होती. घटना घडल्यानंतर तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले होते. लष्करानेही चार जवानांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती.
हे ही वाचा:
महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्याला गालबोट, उष्माघातामुळे १० जणांचा मृत्यू
पायधुनीत तलवार गँगचा धूमाकूळ, दुकानात नाचविल्या नंग्या तलवारी
भटिंडातील लष्करी तळातील तोफखाना विभागात ही घटना घडली. त्याच भागात जवानांचे कुटुंबीयही राहतात. दोन दिवसांपूर्वी त्या ठिकाणाहून एक रायफल हरवल्याची तक्रारही समोर आली होती.
त्यानंतर लष्करी तळाची सुरक्षा वाढविण्यात आली होती. रायफलसोबतच २८ काडतुसेही गायब झाल्याचे समोर आले होते. लष्करी जवान यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती.