पंच प्रभाकर साईल याने केलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर आता खारघरमधील एका जुन्या प्रकरणातील अजून एक पंच समोर आला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासमोरील आव्हाने वाढणार आहेत. शेखर कांबळे याने एनसीबीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचे त्याने सांगितले आहे.
‘खारघरमधील ८०/२०२१ या नायजेरियन ड्रग्स पेडलर प्रकरणात मला पंच करण्यात आले होते. त्यावेळी १० कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या. ती कारवाई बोगस होती, असा आरोप पंच शेखर कांबळे याने केला आहे. त्यावेळी मला पंचनामा वाचायला दिला नाही. जी कारवाई केली गेली ती बोगस होती. त्यात काही सापडलं नव्हते. मात्र, ६० ग्रॅम एमडी सापडल्याचे दाखवण्यात आले होते, असे कांबळे याने सांगितले.
हे ही वाचा:
दादर टीटी उड्डाणपुलाजवळ ‘तेजस्विनी’ धडकली डंपरला!
पंतप्रधान मोदींच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी “कर्मयोगी नमो!” लघुपट स्पर्धा
हिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण!
‘काल टीव्हीवर मी खारघर नायजेरियन प्रकरणाची बातमी बघितली. त्यामुळे मला भीती वाटली. अनिल माने, आशिष रंजन आणि एनसीबी अधिकाऱ्यांचा मला फोन आला. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. काल रात्री उशिरा एनसीबी अधिकारी अनिल माने यांनी मला फोन केला व कोणाकडेही याबद्दल वाच्यता करु नको’, असे सांगितले. समीर वानखेडेंनी आपल्याला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करायला सांगितली होती, असा दावा शेखर कांबळे याने केला आहे. काहीही होणार नाही, असे वानखेडेंनी आपल्याला आश्वासन दिले होते, असेही त्याने सांगितले.
‘मला आता भीती वाटतेय. कोर्टात केस जाईल तेव्हा न्यायाधीश जे विचारतील तेव्हा मी काय उत्तर देणार? कारण मी पंचनामा वाचलेला नाही. मी पुढील सगळ्या चौकशीसाठी तयार आहे, असेही शेखर कांबळे याने सांगितले.