उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत एकाला अटक करण्यात आली आहे. गोरखपूर जिल्ह्यातील २९ वर्षीय मैनुद्दीन याला त्याच्या घराजवळून अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अटक करण्यात आलेला आरोपी हा दुकानदार असल्याचे सांगितले जात आहे. त्याला गोरखपूर जिल्ह्यातील एका हिंदु मुलीशी खोटी ओळख दाखवून लग्न करून धर्मांतराचा दबाव टाकल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. ही अटक नव्या धर्मांतर विरोधी कायद्यान्वये करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार जवळपास वीस वर्षे वयाच्या मुलीने, तो मुसलमान समाजातील आणखी एका मुलीशी लग्न करणार असल्याचे उघड झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती.
ठाणे अधिक्षक देवेंद्र सिंग यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला शनिवारी पोलिस ठाण्यात दाखल झाली. तिने भेलापूर गावात दुकान चालवणाऱ्या मैनुद्दीन याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या महिलेने असा आरोप केला की मैनुद्दीन याने स्वतःची ओळख मनु यादव अशी करून दिली होती. त्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी मंदिरात त्या दोघांचा विवाह झाला. मात्र काही आठवड्यातच तिच्यासमोर त्याची खरी ओळख उघड झाली.
याबद्दल तिने मैनुद्दीनकडे जाब विचारल्यानंतर त्याने या महिलेचा छळ करायला सुरूवात केली. तो तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकू लागला. तिने धर्मांतराला विरोध केल्यानंतर मैनुद्दीन याने तिला मारहाण करायला सुरूवात केली. त्यानंतर या महिलेने त्याचे घर सोडले आणि ती गोरखपूर शहरात आपल्या पालकांसोबत राहू लागली.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिने मैनुद्दीन आणि तिच्या लग्नाचे फोटो पुराव्यादाखल दाखवले. मैनुद्दीनने आणखी एका मुस्लिम मुलीशी विवाह करण्याचे ठरवल्यानंतर या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
नव्या धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत या मैनुद्दीनला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर या कायद्यातील विविध कलमे लावण्यात आली आहेत. योगेंद्र कृष्ण नारायण या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलिस मैनुद्दीन याच्या चुलत भावाचा देखील शोध घेत आहेत. त्याच्यावर या महिलेला फसवण्यासाठी मैनुद्दीनला मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.