जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे एका तरुणाने बनावट नोटा छापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युट्युबवरून शिकून या नोटा छापण्याचा घाट या तरुणाने घातला असून जामनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उमेश चुडामण राजपूत (वय २२) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
उमेश याने युट्यबवरून नोटा छापण्याचे व्हिडिओ पाहून प्रिंटरच्या माध्यमातून चक्क बनावट नोटा छापल्या. जामनेर तालुक्यातील पहूर बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना हिंगणे बुद्रूक येथील उमेश राजपूत नावाचा तरुण नकली नोटा बनवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी प्रिंटर आणि २०० रुपयांच्या ४५ बनावट नोटा तसेच नोटा बनविण्यासाठी लागणारे कागद असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात या तरुणाने बनावट नोटा करण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. बनावट नोटेबाबत सुरुवातीला तरुणाने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, खाकीचा हिसका दाखवताच रंगीत प्रिंटरवर कलर झेरॉक्स नोटा तयार करुन त्या मार्केटमध्ये देत असल्याची कबूली या तरुणाने दिली. याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
हे ही वाचा:
ज्ञानवापीत सर्वे होणारच! सर्वोच्च न्यायालयाचा फैसला
मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे, पोलिस उपनिरिक्षक अमोल गर्जे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विनय सानप, ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाल माळी यांनी ही कारवाई केली आहे.