प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी मध्य रेल्वेने मुख्य मार्गानंतर हार्बर लाईनवर एसी लोकल सेवा सुरू केली. १ डिसेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल या मार्गावर एसी लोकल सुरू झाली. मात्र या महिन्याभराच्या कालावधीतच समाजकंटकांकडून एसी लोकलवर दोन वेळा दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून अजून एका आरोपीचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
मानखुर्द आणि तुर्भे इथे एसी लोकलवर दगफेकीच्या घटना घडल्या आहेत. चालत्या ट्रेनवर दगडाचा जोरदार फटका बसल्याने गाडीच्या काचा फुटल्या आहेत. कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. मानखुर्द येथे गाडीवर दगडफेक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तुर्भे येथे गाडीवर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत.
हे ही वाचा:
आयआयटी कॅम्पसमध्ये ऑफर्स कोटी कोटी
… म्हणून गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा नाकारला अंगरक्षक
पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गावर प्रवाशांसाठी १ डिसेंबरपासून एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर महिन्याभरात अशा दोन घटना घडल्याने प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट- विरार आणि विरार- चर्चगेट एसी लोकल चालवल्या जातात. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर सीएसएसटी- कल्याण आणि कल्याण- सीएसएमटी मार्गावर एसी लोकल चालवल्या जातात. एसी लोकलचे तिकीट दर अधिक असल्याने प्रवाशांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती आणि या एसी लोकलकडे पाठही फिरवली होती.