अनोळखी क्रमांकावरून आलेल्या एका व्हिडिओ कॉलमुळे घाटकोपरमध्ये राहणाऱ्या ७५ वर्षीय आजोबांचे बँक खाते रिकामे झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
७५ वर्षीय आजोबा हे घाटकोपर पश्चिम येथे राहण्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईल फोनवर व्हाट्सअप व्हिडोओ कॉल आला होता. आजोबानी तो रिसिव्ह करताच समोरून एक तरुणी नग्न अवस्थेत उभी राहून आजोबांना अश्लील इशारे करीत होती. आजोबानी तात्काळ कॉल बंद केला. काही वेळाने आजोबाना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला व कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला दिल्ली पोलीस आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले व तुम्ही एका मुलींसोबत अश्लील वर्तन करीत असल्याचा व्हिडीओ आमच्याकडे आला असल्याचे सांगून त्यांना धमकी दिली तसेच पैशांची मागणी केली.
हे ही वाचा:
बुद्धिचे विश्वगुरू विश्वेश्वरय्या
के. सुरेश कोस्टगार्डचे १४ वे तटरक्षक दल प्रमुख
कॅनडातील स्वामी नारायण मंदिरावर खलिस्तानी हल्ला
संजय शिरसाट भडकले; नाराजीच्या अफवा पसरवल्या तर
घाबरलेल्या आजोबानी त्यांची पहिली मागणी पूर्ण करताच त्यांना पुन्हा फोन करून पैसे मागण्यात आले. असे करता करता चार ते पाच वेळा त्यांच्याकडून साडेतीन लाखाची रक्कम काढून घेतली. हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येताच आजोबांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
अशा प्रकारच्या घटना नियमित घडत असल्यामुळे पोलिसांकडून सर्वांनाच सावध राहण्याचा सल्ला दिला जात असतो. कोणतीही अनोळखी लिंक आली तर त्यावर क्लिक करू नये, अशा सावधगिरीच्या सूचनाही पोलिसांकडून करण्यात येत असतात.