लस न घेतलेल्याना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या एका टोळीचा छडा लावण्यास मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. युनिट ५ ने याप्रकरणी दोन एजंटना याप्रकरणी अटक केली असून या टोळीचा थेट संबंध उत्तर प्रदेशातील एका डॉक्टरांशी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई बुधवारी कुर्ला परिसरातून करण्यात आलेली असून या गुन्ह्याचा पुढील तपास कुर्ला पोलीस ठाण्याकडे देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने दोन लस घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांना रेल्वे, मॉल व इतर ठिकाणी प्रवेशाला मान्यता दिलेली आहे. मात्र ज्यांनी एकही लस घेतलेली नाही अथवा दुसरा डोस घेण्यास उशीर असल्यामुळे या नागरिकांना रेल्वे प्रवास अथवा मॉल मध्ये प्रवेश दिला जात नाही. मात्र लसीकरण न झालेल्या अथवा एक लस झालेल्या नागरिकांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र आणि युनिव्हर्सल पास देणाऱ्या टोळ्या शहरामध्ये फिरत आहे.
दोन हजार ते पाच हजार रुपये घेऊन हे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ५ ला मिळाली. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांनी एक बोगस ग्राहक उभे करून प्रमाणपत्र काढण्यास दिले असता या टोळीतील एका एजंटने दोन हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र काढून दिले.
हे ही वाचा:
उर्फी जावेद वाचत आहे भगवद्गीता!
जेवणाचे बिल मागितले म्हणून पोलिसाकडून ‘फुकट’ची मारहाण!
अनिल परब, आपण दोन पावले पुढे आला असता तर…
राज्यात येणार शक्ती कायदा! विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर
पोलिसांनी या प्रमाणपत्रासह एजंट आणि त्याचा दुसरा सहकारी एजंटला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे रॅकेट उत्तर प्रदेश दिल्ली येथून चालवण्यात येत असल्याची माहिती समोर आली. या रॅकेट मध्ये डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या दोन एजंटने अनेकांकडून पैसे घेऊन लस घेतल्याचे प्रमाणपत्र बनवून दिले असल्याचे समोर आले आहे. जुबेर शेख (१९) आणि अलफेज हसन खान (१९) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दोघे वडाळा येथे राहण्यास आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी गुन्हा कुर्ला पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
असे बनते प्रमाणपत्र
तुम्ही एकही लस घेतलेली नसेल अथवा एकच लस घेतली असेल आणि तुम्हाला दोन्ही लस घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र पाहिजे असल्यास २ ते ५ हजार रुपये खर्च करावे लागेल, हे एजंट तुमच्याकडून तुमचे आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक घेऊन यूपीत बसलेल्या डॉक्टरला पाठवतात. तो डॉक्टर तुमचा नंबर आणि आधारकार्ड वरची माहिती सरकारी ‘ कोविन अप या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करून तुमचे लसीकरण झाले असल्याचे नोंद करतात. त्यानंतर तुम्हाच्या मोबाईलवर येणार ओटीपी क्रमांक टाकून तुम्ही लसवंत झालात असा टेक्स्ट मेसेज तुमच्या मोबाईल वर येतो. त्यानंतर तुम्ही कोविन अँपवर जाऊन तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांक टाकल्यास तुम्हाला प्रमाणपत्र उपलब्ध होते.