ओडिशातील बालासोरनजीक शुक्रवारी झालेल्या तीन गाड्यांच्या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत असून ९०० जण जखमी झाले आहेत. कोरमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर त्याच्या डब्यांची शेजारच्या रूळांवरून धावणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसला धडक बसली होती. त्यामुळे या अपघाताची व्याप्ती वाढली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पश्चिम बंगालच्या हावडाहून तामिळनाडूतील चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसने शुक्रवारी २ जून रोजी संध्याकाळी ओडिशातील बालासोरपासून ४० किलोमीटर अंतरावर मालगाडीला धडक दिली. त्यानंतर या गाडीचे १८ डबे रुळावरून घसरले. हे घसरलेले डबे शेजारच्या रूळांवरून धावणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसला भीडले. त्यामुळे या अपघाताची भीषणता अनेक पटींनी वाढली. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाता जवळील शालीमार स्टेशनवरून चेन्नई सेंट्रलकडे जात असताना बहंगा बाजार स्थानकावर संध्याकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
सुरुवातीला या अपघातात ५० प्रवाशांना जीव गमवावा लागल्याची माहिती पुढे आली. परंतु, रात्री मृतांची संख्या वाढत जाऊन आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलीय. तर जखमी प्रवाशांच्या संख्येत देखील वाढ झाली असून या अपघातात ९०० लोक जखमी झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा:
बारावीनंतर दहावीतही कोकण सर्वोत्तम
ओदिशात कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात; शेकडो लोक जखमी, ५० दगावल्याची भीती
उत्तन समुद्रकिनाऱ्यावर सापडला शीर नसलेला महिलेचा मृतदेह
बृजभूषणविरोधातील दोन एफआयआर आणि तक्रारीत गंभीर आरोप
या अपघाता जखमी झालेल्या प्रवाश्यांना सोरो सीएसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मदतकार्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफची ५ पथक बचावकार्य करत आहेत.या रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींसाठी २ लाख आणि किरकोळ जखमींसाठी ५० हजाराच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.