सांगलीच्या तासगावमध्ये एका बाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना रविवार, २४ जुलै रोजी घडली होती. तासगाव येथील डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून काल सकाळी एक दिवसाच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. हे बाळ अखेर सापडले असून हॉस्पिटलमधील एका नर्सनेच हे बाळ पळवल्याचे समोर आले आहे.
तासगाव येथील सिद्धेश्वर मंदिर चौकात डॉ. अंजली पाटील यांचे रुग्णालय असून, संबंधित आरोपी महिला रुग्णालयात दोनच दिवसांपूर्वी नर्स म्हणून रुजू झाली होती. रुजू होताना या महिलेने आपली सर्व कागदपत्रे एक- दोन दिवसात सादर करते असे डॉक्टरांना सांगितले होते. तसेच, आपण जुळेवाडी येथील रहिवासी असून सध्या तासगावात राहत असल्याची खोटी माहितीही महिलेने दिली होती.
डॉक्टरांनी तिच्यावर विश्वास ठेवत तिला कामावर घेतले. दरम्यान, याच दवाखान्यात चिंचणी येथील एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. शनिवारी या महिलेची प्रसुती झाली होती. रविवारी सकाळी आरोपी नर्स डिलिव्हरी वॉर्डमध्ये गेली आणि या बाळाला घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर आली. त्यानंतर बाळाला काखेतील पर्समध्ये टाकून पसार झाली. अपहरणाची संपूर्ण घटना हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
हे ही वाचा:
“धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार”
द्राैपदी मुर्मू साेमवारी घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ; २१ ताेफांची सलामी देणार
ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!
मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बाळासह आरोपी महिलेला शेणोली स्टेशनवरुन ताब्यात घेतले आहे. बाळ सुखरुप आहे. एलसीबी, विटा आणि तासगावच्या पोलिसांनी एकत्र ही कारवाई करत अवघ्या आठ ते नऊ तासात बाळाचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे. बाळाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून महिलेची तासगाव पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.