हरियाणामधील नूंह भागात पुन्हा एकदा उसळू शकणारा हिंसाचार थोपवण्यात पोलिसांना यश आले. गुरुवारी संध्याकाळी एका धार्मिक विधीसाठी जात असलेल्या महिलांवर दगडफेकीची घटना घडली होती. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेत आठ महिला जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी तीन अल्पवयीन मुलांना पकडले होते. यातील एका नऊ वर्षांच्या मुलाला बाल कल्याण समितीसमोर हजर केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तर, अन्य दोन १२ वर्षांच्या मुलांना किशोर न्याय मंडळासमोर हजर करून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
गुरुवारी रात्री नूंह भागात मशिद आणि मदरशामधून काही अज्ञात व्यक्तींनी कथित दगडफेक केल्याने आठ महिला जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी गंभीरपणे चौकशी केली जात आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांची त्यांच्या आई-वडिलांसमोर चौकशी करून त्यांना पकडले होते.
हे ही वाचा:
उत्तरकाशीत मजुरांना बाहेर काढण्याचा परदेशी तज्ज्ञ, सहा पथके
मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा
निवृत्त आयएएस अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची संपत्ती राम मंदिराला दान
छठ पूजेनिमित्त पूजा साहित्याचे वाटप उत्साहात
‘ही तिन्ही मुले मदरशामधील विद्यार्थी आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे त्यांना पकडण्यात आले आहे. अन्य व्यक्तींचा यामागे हात आहे का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र तपास सुरू आहे. यामागे आणखी कोणाचा सहभाग असल्याचे समोर आल्यास आम्ही त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करू,’ असे नूंह येथील पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या महिला विहिरीचे पूजन करण्यासाठी जात होत्या. तर, मदरशामधील मुले आपापसांत चप्पल आणि दगडांनी खेळत होती, त्यातील काही दगड चुकून या महिलांना लागले, असा दावा या मदरशातील अधिकाऱ्यांनी केला आहे.