पंतप्रधानांच्या सभेत शस्त्रांसह घुसखोरी करण्याचा प्रयत्न

दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

पंतप्रधानांच्या सभेत शस्त्रांसह घुसखोरी करण्याचा प्रयत्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये बीकेसी मैदानात झालेल्या सभेत मोठी घटना घडणार होती. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली आहे. पंतप्रधानांच्या या सभेमध्ये घुसखोरी करण्याचे दोन प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. बीकेसी मैदानावर झालेल्या सभेच्या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडून पोलिसांनी प्राणघातक शस्त्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांची वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेच्या आधी पंतप्रधानांची सुरक्षा भेदून आरोपी घटनास्थळी पोहचले. आपण एनएसजी कमांडो असल्याचे सांगत त्याने VVIP भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. रामेश्वर मिश्रा असे या संशयिताचे नाव. मिश्रा याने आपण लष्कराच्या ‘गार्ड्स रेजिमेंट’मध्ये नाईक असल्याचे खोटे सांगून प्रवेश मिळवला. तो सभेत अतिमहत्वाच्या व्यक्तींमध्ये प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात होता.

मिश्रावर मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांना संशय आला. सुरक्षा रक्षकांनी ओळखपत्र तपासले असता १३ जानेवारी रोजी मिश्राला एनएसजी ओळखपत्र देण्यात आल्याचे आढळून आले. पण मिश्रा याचे ओळखपत्र एनएसजीच्या इतर जवानांच्या ओळखपत्रांशी जुळत नव्हते. त्याने गळ्यात एलिट नॅशनल सिक्युरिटी गार्डचे ओळखपत्र घातले होते. त्यावर त्याला ‘रेंजर’ म्हणून तैनात केल्याचे लिहीले होते. तर ओळखपत्राच्या रिबिनवर ‘दिल्ली पोलिस सुरक्षा (PM)’ असे लिहिल्याचे समोर आले आहे. त्याचे ओळखपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. यानंतर त्याला वांद्रे न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने आरोपीला २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आणखी एका व्यक्तिस रिव्हॉल्वर आणि चार राउंडसह अटक

घुसखोरीच्या दुसऱ्या प्रयत्नात पंतप्रधान यांच्या सभेच्या ठिकाणी आणखी एका व्यक्तीला रिव्हॉल्वर आणि चार राउंडसह अटक केली आहे. सभेच्या ठिकाणी घुसण्याच्या प्रयत्नात असताना त्याला बंदोबस्तावरील पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याची तपासणी केली असता एक रिव्हॉल्वर आणी ४ जीवंत राउंड त्याच्याकडून ताब्यात घेतले. श्रीकांत गायकर (३९)असे त्याचे नाव असून तो भिवंडी तालुक्यातील वाहुली गावात राहणारा आहे. गायकर याचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्याच्या विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. सभेत रिव्हॉल्वर घेऊन घुसण्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

 

Exit mobile version