ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळील कशेळी येथे सराईत गुंड गणेश कोकाटे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली आहे. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या गणेश कोकाटे याला उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.
या गोळीबाराच्या घटनेने भिवंडीत एकच खळबळ उडाली असून सामन्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गणेश कोकाटे हा पूर्वी ठाणे शहरात राहण्यास होता व नुकताच तो भिवंडीतील काल्हेर येथे राहण्यास गेला होता. बुधवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास गणेश कोकाटे हा आपल्या बलेनो मोटारीतून ठाण्यातून भिवंडीच्या दिशेने निघाला होता. कशेळी जवळ येताच दुचाकी वरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने गणेश कोकाटे याच्यावर बेछूट गोळीबार करून पोबारा केला. या गोळीबाराची माहिती मिळताच भिवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोळीबारात जखमी झालेल्या गणेशला उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे.
हे ही वाचा:
हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक
मीराबाई चानूचे ‘दोनशे टक्के’ यश
उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरु
चालत्या ट्रेनमध्ये दरोडा टाकणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
गणेश कोकाटे याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. कोकाटे हा गुंड प्रवृत्तीचा असून पूर्व वैमनस्यातून त्याच्यावर विरोधकांनी हल्ला केला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.