बिहारच्या जमुई जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने एका पोलिस उपनिरीक्षकाला ठार मारले आहे.प्रभात रंजन असे मृताचे नाव असून ते गढी पोलिस स्टेशनचे प्रभारी होते. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला असून चालक अद्याप फरार आहे.या घटनेत होमगार्डसह दोन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जमुईच्या माहुलिया तांड गावात ही घटना घडली. प्रभात रंजन असे मृत पोलिसाचे नाव असून ते सिवान जिल्ह्यातील रहिवासी होते.मृत पोलीस प्रभात रंजन हे गढी पोलिस स्टेशनचे प्रभारी होते.जखमी झाल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,असे पोलिसांनी सांगितले.
मृत पोलीस प्रभात रंजन यांच्या पश्चात चार वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांचा मुलगा आहे. नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांची पत्नी सध्या दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल आहे.आज संध्याकाळपर्यंत त्यांचे कुटुंबीय जमुईला येणे अपेक्षित आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बिहारचे शिक्षण मंत्री चंद्र शेखर यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.ते म्हणाले, “अशा घटना काही नवीन नाहीत. या सतत घडत असतात. अशा घटना यापूर्वी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात घडल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.तसेच या प्रकरणातील आरोपींना कायद्यानुसार शिक्षा होईल, ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा:
कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!
मायकल जॅक्सनच्या ४० वर्षापूर्वीच्या जॅकेटची किंमत २.५ कोटी!
केरळातील पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्कार, हत्येप्रकरणी आरोपी अश्फाकला फाशी
कर्नाटकात परिक्षागृहात हिजाब घालण्यास मनाई!
या दुर्घटनेत एक होमगार्ड देखील जखमी झाला आहे.राजेश कुमार असे जखमी होमगार्डचे नाव आहे.त्याला जमुई येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जमुईचे एसपी शौर्य सुमन यांनी सांगितले की, या घटनेत सहभागी असलेला मिथिलेश कुमार याला अटक करण्यात आली आहे.मात्र, मुख्य आरोपी ट्रॅक्टरचा चालक कृष्णा हा फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला असून चालकाला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, या घटनेने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.जमुईचे खासदार चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.ते म्हणाले, राज्यातील वाळू तस्करांविरुद्ध कोणतीही “ठोस पावले” का उचलली गेली नाहीत. “बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे नदीत बुडून लोकांचा मृत्यू होत आहे, तर अनियंत्रित वाहने सुरक्षा दलांना चिरडत आहेत”, ते पुढे म्हणाले.