वानखेडे स्टेडियम, हॉटेलची अतिरेक्यांकडून रेकी नाही!

वानखेडे स्टेडियम, हॉटेलची अतिरेक्यांकडून रेकी नाही!

महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

वानखेडे स्टेडियम अथवा हॉटेलची अतिरेक्यांकडून कुठल्याही प्रकारची रेकी करण्यात आलेली नसल्याचा खुलासा गृहमंत्रालयाकडून करण्यात आला आहे. वानखेडे स्टेडियमची दहशतवाद्यांकडून रेकी करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते, त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने उपरोक्त स्पष्टीकरण दिले आहे.

आयपीएल क्रिकेट सामने असल्यामुळे क्रिकेटचे सामने होणाऱ्या मैदानाबाहेर सुरक्षा देणे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेणे हे सुरक्षा यंत्रणेचे काम असल्याचे गृहविभागाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार “अलीकडे आम्ही कुठल्याही अतिरेक्याला अटक केलेलेच नाही, त्यामुळे या ठिकाणची अतिरेक्यांकडून रेकी करण्यात आली, अशी माहिती एटीएस कडून सुरक्षा यंत्रणेला देण्यात आलेली नसल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांकडून आयपीएल मॅचच्या अनुषंगाने अलर्ट देण्यात आले असून सुरक्षेच्या संदर्भात महत्त्वाच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

वानखेडे स्टेडियम आणि ब्रेब्रॉंन स्टेडियमवर या आयपीएलच्या लढती होणार आहेत. या आयपीएल सामन्यांच्या अनुषंगाने कोणताही घातपात होऊ नये म्हणून या सूचना करण्यात आल्या आहेत.

आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसेच हॉटेल्सवर मुंबई पोलीसांकडून आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येत आहे. अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडेंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंतच्या मार्गाची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपुट किंवा माहिती प्राप्त झालेली नाही.

वानखेडे स्टेडियमची रेकी दहशतवाद्यांनी केल्याची गोपनीय माहिती तपासयंत्रणांना मिळाल्याचे वृत्त होते. दहशतवाद्यांनी स्टेडियम आणि खेळाडू राहत असलेल्या हॉटेल्सची रेकी केली, असे या वृत्तात म्हटले होते. तसा अलर्ट आल्याचे सांगितले जात होते. मात्र तसे काहीही नसल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.

हे ही वाचा:

योगी आदित्यनाथ घेणार दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

महेंद्रसिंग धोनीने सोडले चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधार पद

ठाकरे सरकारच्या मतांना न्यायालय दाखवते केराची टोपली

काश्मीर फाईल्सने जमवला २०० कोटींचा गल्ला! रचला ‘हा’ अनोखा विक्रम

 

२५ मार्च ते २३ मेपर्यंत मुंबईत आयपीएल होणार आहे. या कालावधीत खेळाडूंच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. खेळाडू राहत असलेल्या हॉटेल्सची नीट पाहणी करून याठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची कसून चौकशी करावी तसेच अनोळखी लोकांना खेळाडूंच्या जवळ जाऊ देऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. खेळाडू राहत असलेल्या ठिकाणांचा नकाशा तयार करून बंदोबस्ताची तयारी करावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version