दहावी पास झालेल्या मुलाला कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी पैशाची गरज असलेल्या एका पित्याने घरात एकट्या असणाऱ्या वयोवृद्ध महिलेवर चाकूने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दक्षिण मुंबईतील गावदेवी परिसरात घडली.
या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गावदेवी पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. वयोवृद्धावर हल्ला करण्याची मागील पंधरवड्यातील दक्षिण मुंबईतील ही दुसरी घटना असून ताडदेव येथे झालेल्या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकट्या दुकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शमीना नाकारा (६८) असे हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेचे नाव आहे. शमीना दक्षिण मुंबईतील गोवलिया टॅंक, येथील सकिना पॅलेस या इमारतीच्या तळमजल्यावर पतीसह राहण्यास आहे. तिचे पती शेअर्स ब्रोकर असून ते नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. शमीना एकट्याच घरात होत्या, शमीना यांना मागील अनेक वर्षांपासून जेवणाचा डबा घेऊन येणारा महेश पानवाल हा त्या ठिकाणी डब्बा घेऊन आला.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे झाले आहेत स्वस्तातले पवार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अल्लू अर्जुन, आलिया भट्ट सर्वोत्तम
कार्लसनने वर्ल्डकप जिंकला, प्रज्ञानंदने जिंकली मने
१६ आमदारांकडून नार्वेकरांना ६ हजार पानी उत्तर
त्याने जेवणाचा डबा देत शमीना यांच्याकडे मुलाच्या कॉलेज अडमिशमसाठी ५० हजार रुपये उसने मागितले. परंतु शमीनाने पैसे देण्यास नकार देत त्याला जाण्यास सांगितले. मुलाचे ऍडमिशम कसे होईल या विचारात असलेल्या महेश याने शमीनाला मारून पैसे घेण्याचे ठरवले व शमीना यांना घरात लोटत खिशातून चाकू काढून शमीना यांच्यावर हल्ला केला, शमीना यांनी याहल्लातून स्वतःचा बचाव करून मदतीसाठी हाक मारली. शमीनाची हाक एकूण वॉचमन याने शमीनाच्या घराजवळ धाव घेतली व शमीनावर हल्ला होत असल्याचे बघून त्याने तात्काळ पोलिसांना फोन लावला.
काही वेळातच गावदेवी पोलीस ठाण्याचे पथक सकिना पॅलेस मध्ये दाखल झाले व हल्लेखोर महेश पानावाल याला ताब्यात घेऊन जखमी शमीनाला उपचारासाठी नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.
महेश हा मागील सात वर्षांपासून शमीना यांना डबा पोहोचविण्याचे काम करतो.त्याचा मुलगा दहावीत पास झाला मात्र पैसे अभावी त्याला चांगल्या कॉलेजात प्रवेश घेता येत नव्हता, त्याने अनेकांकडे पैसे मागितले परंतु त्याला कोणीही पैसे दिले नाही. शेवटी त्याने शमीना यांच्याकडे ५० हजार रुपये उसने मागितले, परंतु तिनेही देण्यास नकार दिल्यामुळे संतापाच्या भरात त्याने शमीना हिच्यावर प्राणघातक हल्ला केला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलिसानी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी महेश पानावाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.