आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नाही; एनसीबीच्या विशेष तपास पथकाचा अहवाल

आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नाही; एनसीबीच्या विशेष तपास पथकाचा अहवाल

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याबद्दल आता एनसीबीकडून नवी माहिती समोर आली आहे. आर्यन खान हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असे एनसीबीच्या विशेष तपास पथकाला (SIT) आढळून आले आहे.

एनसीबीच्या मुंबई विभागाने केलेल्या आरोपांच्या विरोधात एसआयटीचे काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. आर्यन कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता असे चॅट्स सुचवत नाहीत. एनसीबी मॅन्युअलमध्ये अनिवार्य असूनसुद्धा छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नव्हता आणि गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असे निष्कर्ष एनसीबीच्या एसआयटीने काढले आहेत.

एसआयटीचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांना अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात. हा अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी कायदेशीर मतं घेतली जातील. विशेषत: आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज आढळले नसतानाही ड्रग्ज सेवनासाठी शिक्षा होऊ शकते का, या पैलूवर कायदेशीर मते घेतली जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आर्यन खानने त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितले नव्हते, असे आता एसआयटीच्या चौकशीतून समोर आले आहे.

हे ही वाचा:

फेब्रुवारी महिन्यात जीएसटीचे एकूण संकलन १,३३,०२६ कोटी रुपये

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

युक्रेनमध्ये व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्या देणार फ्री कॉलींग

ताज महालच्या ‘नो फ्लायिंग झोन’ मधून विमान गेल्याने खळबळ

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रॉन, २१ ग्रॅम गांजा, MDMAच्या २२ गोळ्या आणि रोख १.३३ लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती. जवळपास महिनाभर कारागृहात राहिल्यानंतर आर्यन खानची गेल्या वर्षी २८ ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका झाली होती.

Exit mobile version