केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्याने खंडणीची मागणी केली होती . याप्रकरणी पोलिसांनी बेळगाव कारागृहातील कैद्याकडून २ मोबाईल आणि २ सिमकार्ड जप्त केले आहेत. गडकरी यांना १४ जानेवारीला आलेल्या धमकीच्या कॉलमध्ये १०० कोटी आणि नंतर तीन दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या कॉल मध्ये १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. या धमकी प्रकरणाचा पोलीस कसून शोध घेत होते.
गडकरींच्या कार्यालयात तीन दिवसांपूर्वी पुन्हा धमकीचा फोन आला होता. या कॉलचे ठिकाणही बेळगाव कारागृह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर नागपूर पोलिसांनी कर्नाटक गाठून स्थानिक पोलीस आणि तुरुंग कर्मचाऱ्यांच्या मदतीने सखोल शोधमोहीम राबवली. या शोध मोहिमेत पोलिसांना तुरुंगात २मोबाईल आणि २ सिमकार्ड सापडले. या दोन्ही सिमकार्डचा वापर गडकरींना धमकावण्यासाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. यापैकी पहिला धमकीचा कॉल एका सिमवरून तर दुसरा फोन दुसऱ्या सिमकार्डवरून करण्यात आला होता.
बेळगाव तुरुंगात असलेल्या जयेश याने गडकरी यांना पहिला धमकीच कॉल केला होता. त्यामुळे दुसरा कॉल देखील जयेशने केला असावा, असा संशय नागपूर पोलिसांना होता. पोलिसांचा हा संशय खरा ठरला. नागपूर पोलिसांनी कसून तपास केला असता धक्कादायक माहिती मिळाली. बेळगावी कारागृह परिसरातून हा फोन करण्यात आला होता. येथूनच जयेशने पहिला फोन केला होता. बेळगाव कारागृहातून जयेशने हे दोन्ही कॉल केले होते असे आढळून आले आहे.
नागपूर पोलिसांनी जयेशला कर्नाटकातील बेळगाव पोलिसांकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच त्याला नागपुरात आणले जाऊ शकते.
हे ही वाचा:
परदेशातल्या खलिस्तान समर्थकांचे पासपोर्ट होऊ शकतात रद्द, नातेवाईकांवरही कारवाई
बीबीसीचा निषेध! निषेध!! पंतप्रधान मोदींची बदनामी केल्याबद्दल निंदाव्यजक ठराव
कॅगच्या अहवालात उघड झाला भ्रष्टाचार; टेंडर नाहीत, करार नाहीत, ऑडिटर नाही…
मी महाराष्ट्राची मुलगी, आज माहेरी आल्यासारखे वाटते आहे!
ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. यापैकी एका सिमचा वापर जानेवारी महिन्यात धमकीचे कॉल करण्यासाठी करण्यात आला होता. तर दुसऱ्या सिमकार्डसाठी १५ दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. जयेशला हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात आले.