कर्ज… कायदेशीर कारवाई… जप्ती यातून नितीन देसाई तणावग्रस्त

त्याच्यावर तब्बल २५२ कोटी रुपयांचे कर्ज होते

कर्ज… कायदेशीर कारवाई… जप्ती यातून नितीन देसाई तणावग्रस्त

कला दिग्दर्शक नितीन देसाई हे कर्जबाजारी झाले होते, त्यांच्यावर तब्बल २५२ कोटी रुपयांचे कर्ज होते, व त्यांची ‘एनडी’स आर्ट वर्ल्ड प्रा. लिमिटेड’ दिवाळखोरीत निघाल्यामुळे नैराश्यापोटी नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी’स स्टुडिओ येथे बुधवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नितीन देसाई यांच्या ‘एनडी’स आर्ट वर्ल्ड प्रा. लिमिटेड’या कंपनीच्या विरोधात ‘एनसीटीएल’ न्यायालयाने कर्जबाजारी घोषित करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. नितीन देसाई यांना न्यायालयाची ही ऑर्डरकॉपी २५ जुलै रोजी प्राप्त झाली होती. एडलवाईज असेट या कंपनीने नितीन देसाई यांच्या ‘एनडी’स आर्ट वर्ल्ड प्रा. लिमिटेड’या कंपनीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

देसाई यांनी ‘एनडी’स आर्ट वर्ल्ड प्रा.लिमिटेड’ या कंपनीच्या नावावर १५० कोटी आणि ३१ कोटी रुपयांचे दोन कर्जे घेतली होती. जानेवारी २०२० पासून नितीन देसाई यांनी कर्जाचे व्याज भरणे बंद केल्याचा याचिकेत उल्लेख करण्यात आला होता. कर्जाची रक्कम जवळ जवळ २५२ कोटीच्या घरात गेली होती. न्यायालयाने ही याचिका निकालात काढून नुकतीच या याचिकेवर सुनावणी झाली, यामध्ये नितीन देसाई यांच्या कंपनीला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने जारी केले होते.

हे ही वाचा:

गलवानमध्ये वडील गमावले; पण १४ वर्षीय प्रसन्नाला हॉकीने सावरले!

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

मणिपूर हिंसाचाराचा अर्थव्यवस्थेवर परिणाम; जीएसटी संकलनात घट

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती ऑफर

२५ जुलै रोजी नितीन देसाई यांना न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला होता, तेव्हापासून देसाई हे तणावात होते. या तणावातून त्यांनी अखेर बुधवारी कर्जत येथे ५३ एकर वर वसलेल्या एनडी’स स्टुडिओ मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. मुंबईतील पवई येथे राहणारे नितीन देसाई यांच्या कुटुंबियांना पोलिसांकडून सूचना देण्यात आली आहे. याप्रकरणी खालापूर पोलिसानी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.

Exit mobile version