नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर सिंधुदुर्ग न्यायालयाबाहेर राडा

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर सिंधुदुर्ग न्यायालयाबाहेर राडा

सिंधुदुर्ग न्यायालयाने भाजपाचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या जामिनाचा अर्ज मंगळवारी फेटाळला आणि या न्यायालयाबाहेर चांगलाच राडा झाला. नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयाबाहेर येऊन नितेश राणे हे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत, असे म्हटल्यानंतर राणे यांना तिथेच काही काळ थांबविण्यात आले. त्यावरून नितेश यांचे बंधू निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. आपल्याला इथे का थांबविण्यात आले आहे, नेमके कारण काय, न्यायालयातील प्रक्रिया संपली असेल तर इथे थांबविण्यामागे कारणे काय आहेत, अशी विचारणा निलेश राणे पोलिसांना करत होते. पोलिसही त्यांच्याशी संवाद साधत होते पण नेमके काय थांबविण्यात आले ते सांगण्यात आले नाही.

संतोष परब यांच्यावरील हल्ल्याचे हे प्रकरण असून त्यात या हल्ल्यात नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप करण्यात आला आहे.

निलेश राणे म्हणाले की, ओपन कोर्टमध्ये ऑर्डर झाली आहे मग तुम्ही आम्हाला का थांबवले आहे. पोलिस आणि निलेश राणे यांच्यात चांगलाच वाद रंगला. शेवटी त्यांना पोलिसांना जाऊ दिले. तेव्हा नितेश राणे गाडीतच बसलेले होते. पण हा वाद थांबल्यानंतर नितेश राणे गाडीतून बाहेर आले आणि ते मग चालत पुढे गेले.

पत्रकारांनी पोलिसांना विचारल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही काम करत आहोत असेच उत्तर ते देत होते. एकूणच हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे.

हे ही वाचा:

Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?

Budget 2022: शेती क्षेत्रात ड्रोन्सचा वापर होणार

Budget2022 : RBI द्वारा ‘डिजिटल रुपया’ सादर होणार

Budget 2022: अर्थमंत्र्यांनी करांसंबंधित काय केल्या घोषणा… 

 

नितेश राणे यांचे वकील म्हणाले की, ही पोलिसांची दादागिरी आहे. त्यांना अटक करता येणार नाही, अशी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही पोलिस दादागिरी करत आहेत. पोलिस त्यांना अटक करण्याच्या तयारीनेच आले होते. पण त्यांना कुणीही अटक करू शकत नाही.

न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयासमोर त्यांनी शरण यायला हवे मग जामिनासाठी अर्ज करता येईल, त्यामुळे त्यांचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला, असे वादींच्या वकिलांनी सांगितले.

Exit mobile version