मुंबईत साकीनाका येथे झालेला बलात्कार आणि त्यातील महिलेचा नंतर झालेला मृत्यू या घटनेनंतर ठाकरे सरकारवर चहुबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर आता महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा प्राधान्याने चर्चिला जाऊ लागला आहे.
मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सोमवारी सूचना जाहीर करत महिलांच्या बाबत सतर्क राहण्याचे आदेश दिल्यानंतर आता महिलांच्या सुरक्षेचा विचार करून मुंबई पोलिसांकडून निर्भया पथक आणि सक्षम नावाच्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सुरक्षेसाठी वूमन सेफ्टी सेल स्थापन केले जाणार असून त्याद्वारे महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले टाकण्याचा प्रयत्न होणार आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागात एक महिला एसीपी अधिकारी असतील आणि महिला पोलीस निरीक्षक हे वूमन सेफ्टी सेलचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत.
हे ही वाचा:
वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला भाजपाची जोरदार चपराक
अमरिंदर म्हणतात, शेतकरी आंदोलन पंजाबात नको, तिकडे दिल्लीत करा!
शिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याने इराण तालिबानवर नाराज?
लवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत
महिला सुरक्षेसाठी १०३ हा हेल्पलाईन क्रमांक असणार आहे. तर निर्भया पथकातील कर्मचारी अधिकाऱ्यांना पेन कॅमेऱ्या यासारख्या अत्याधुनिक साहित्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. त्याच्या माध्यमातून दिवसभरातील कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगाराची यादी तयार करून त्यांना तपासण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत.
प्रत्येक शाळा महाविद्यालयात निर्भया पेटी नावाने बॉक्स तयार करण्यात येणार ज्यात मुली, महिला त्यांच्या समस्या मांडू शकतात. गस्तीच्या वेळी या तक्रारपेटीतील तक्रारींची पोलिसांना दखल घ्यावी लागणार आहे.
मुंबईतील बलात्कारांची व महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढल्यानंतर ठाकरे सरकारवर तसेच पोलिसांवर टीका होऊ लागली. कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता उशीरा का होईना पावले उचलली आहेत.