महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मानखुर्द येथून जप्त करण्यात आलेल्या २१ कोटी किमतीच्या ७ किलो युरेनियमचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या संबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर एनआयएने युरेनियम प्रकरणी नव्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
महाराष्ट्र एटीएसने मानखुर्द, मंडाळा येथून ७ किलो १०० ग्राम युरेनियम जप्त केले होते. जप्त केलेल्या या युरेनियमची भाभा अणुशक्ती केंद्रातर्फे तपासणी करण्यात आली. गेल्या आठवड्यात भाभा अणुशक्ती केंद्राकडून आलेल्या अहवालात हे नॅचरल युरेनियम असून मानवी जीवनास घातक असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी एटीएसच्या काळाचौकी युनिट मध्ये गुन्हा दाखल करून जिगर पंड्या आणि अबू ताहीर चौधरी या दोघांना अटक करण्यात आली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
हे ही वाचा:
स्वतःच्या मुलाला मंत्री केलंत, तसंच आता बहुजनांच्या मुलांच्या नियुक्त्या करा
सावरकर म्हणाले, हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण या प्रश्नासारखा वाटतो!
भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान
या घटनेची गंभीरता बघून केंद्र गृहमंत्रालयाने या गुन्ह्याचा तपास एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या आदेशानंतर एनआयएने या प्रकरणात नव्याने गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला आहे. एटीएसकडून आरोपीचा ताबा आणि या गुन्हयातील कागदपत्रेही एनआयएने हाती घेतली आहेत.
या प्रकरणातला प्रमुख आरोपी अबू ताहीर याने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, “६ वर्षांपूर्वी वडिलांना भंगारमध्ये युरेनियम आले होते व ते आम्ही युनिक वस्तू म्हणून कपाटात ठेवली होती. लॉकडाऊन च्या काळात या वस्तूची माहिती इंटरनेट वर मिळवून त्याचे काही तुकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. हे युरेनियम असल्याचे कळल्यानंतर आम्ही त्याचे ग्राहक शोधत होतो.”
अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण, त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या कारचे प्रकरण, मनसुख हत्या प्रकरणानंतर आता युरेनियम प्रकरण देखील राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आले आहे.