दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांशी संबंधित राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने महाराष्ट्रसह आणखी काही राज्यांमध्ये कारवाई केली आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात ही कारवाई करण्यात आली असून तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. देशविघातक कृत्यात सहभाग असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे.
एनआयएने शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासह आणखी चार राज्यांमध्ये कारवाईला सुरुवात केली आहे. जवळपास २२ ठिकाणी छापा टाकत कारवाई करण्यात आली आहे. जम्मू- काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली या राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांशी संबंधित ही कारवाई आहे. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात छापे टाकले आहेत. तर, काश्मीरमध्येही अन्य ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे.
हे ही वाचा:
पवारांनी लावली ७५ टक्के आरक्षणाची काडी
अमितभाई कल किसने देखा आताच निर्णय घ्या…
सद्गुरुंच्या मागे लचांड लावणारे नेमके कोण?
आमदार अतुल भातखळकरांच्या मागणीला यश, ‘अकृषिक कर रद्द’
महाराष्ट्रात जालना, मालेगाव आणि संभाजीनगर येथे पहाटे चार वाजल्यापासून एनआयए आणि एटीएसच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. जालन्यातल्या गांधीनगर येथे एनआयने कारवाई केली आहे. सकाळी चार वाजल्यापासून पथकानं ही कारवाई केली असून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. समद सौदागर असं या संशयित व्यक्तीचं नाव असून तो चामड्याचा व्यापारी आहे. तर, किरपुडा भागातून मौलाना हाफिज याला ताब्यात घेण्यात आलं आहे. आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मालेगावमध्येही एका होमेपथी क्लिनिकवर छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून एटीएसचा काही तरुणांवर संशय होता. त्यादृष्टीने त्याच्यावर पाळत ठेवली जात होती. या तरुणांचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय एटीएसला होता. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.