निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सचिन वाझे हा काय लादेन आहे का? असा प्रश्न विचारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझेची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. पण जसजसा राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचा तपास पुढे जात आहे तसे वाझे हे लादेन मार्गीच असल्याचे सिद्ध झाले आहे. सचिन वाझे ह्याच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियम या दहशतवाद विरोधी कायद्याची कलमे लावली आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ आणि त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही केसेस सध्या भारतभर गाजत आहेत. एपीआय सचिन वाझे हा स्फोटक प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे. वाझे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहे. वाझेला अटक झाल्यापासून रोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत असून वाझे विरोधात सज्जड पुरावे मिळत आहेत.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये अजून एका भाजपा कार्यकर्त्याला फासावर लटकावले
ठाणे सत्र न्यायालयाचा एटीएसला दणका
एनआयएने आता वाझे विरोधात यूएपीए अर्थात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियम या कायद्या अंतर्गत दहशतवादाची कलमे लावली आहेत. मुंबई येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने यासंदर्भातील माहिती दिली. युएपीए कायद्याची कलम १३ आणि १६ लावण्यात आली आहेत असे एनआयए कडून न्यायालयात सांगण्यात आले. त्यामुळे सचिन वाझे याच्या अडचणीत वाढ झालेली दिसत आहे.
दरम्यान एनआयए आणि एटीएसच्या तपासात आत्तापर्यंत वाझे विरोधात अनेक महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. वाझे याचे बनावट आधारकार्ड समोर आले असून ट्रायडेंट हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाझे पाच बॅग्स घेऊन जाताना दिसत आहे. तर वाझेशी संबंधित अनेक गाड्याही एनआयएने ताब्यात घेतल्या आहेत. मनसुख हिरेन यांच्या हत्येतही वाझेचे नाव समोर येत आहे. या प्रकरणाचाही तपास आता एनआयए करणार आहे.