दहशतवाद्यांना निधी पुरवल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने काश्मीरचे व्यापारी जहूर अहमद शाह वटाली याच्या १७ मालमत्ता जप्त केल्या आहेत. याच प्रकरणात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ)चा कमांडर यासिन मलिक आजीवन तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.
यासिन मलिकसह जमात-उद-दावाचा आमिर आणि लष्कर-ए-तैयबाचा मुख्य कमांडर हाफिज मुहम्मद सईद आणि हिब्ज-उल-मुजाहिदिनचा मुख्य कमांडर सैयद सलाहुद्दीन यांच्यासह १७ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनआयएने या प्रकरणाची ३० मे २०१७ रोजी स्वत:हून दखल घेतली होती. या प्रकरणी मलिकला त्याच्यावरील सर्व आरोपांत दोषी जाहीर करण्यात आले असून तो सध्या आजीवन तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.
हे प्रकरण आयएसआयकडून समर्थन मिळणाऱ्या लष्कर-ए-तैयबा, जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांद्वारा जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांशी संबंधित आहे. या दहशतवादी संघटना सर्वसामान्य नागरिक आणि सुरक्षारक्षकांवर हल्ला करून खोऱ्यात अशांतता पसरवण्याचे आणि हिंसाचार भडकवण्याचे काम करत होत्या.
हे ही वाचा:
गेली ५० वर्षे दोरखंडाच्या सहाय्याने ते उतरतात ४० फूट खोल विहिरीत
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांवर झालेली भक्कम युती आहे!
सलग तीन महिने किरकोळ महागाई दर नीचांकी
जी- २० परिषदेसाठी आलेले परदेशी पाहुणे वारीत दंग
एनआयएने काश्मीरच्या कुपवाडामधील हंदवाडा येथील वटालीशी संबंधित १७ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्ता यूपीए ऍक्टच्या कलम ३३(१) अंतर्गत स्पेशल एनआयए न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आल्या आहेत. या दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये फुटीरतावादी चळवळींना समर्थन देण्यासाठी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचा वापर करत होत्या.
या प्रकरणाच्या तपासात असे उघडकीस आले की, ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्ससहित आरोपींनी गुन्ह्याचा कट रचला आणि काश्मीरमध्ये लोकांना भडकवून हिंसाचाराचा कट रचला. भारतात फुटीरतावादी चळवळ वाढण्यासाठी वटाली हा विविध स्रोतांकडून पैसे जमा करून ते तो हुर्रियत नेत्याला देत असे, असे सूत्रांनी सांगितले.
वटाली हा हाफिज सईद याच्याकडून पैसे घेणारा हवालाचे माध्यम होता, असे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. हाफिज सईद सन २००१मध्ये संसदेवरील हल्ला आणि २००८मधील हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. सन २०११ ते २०१३ दरम्यान त्याच्या खात्यामध्ये कोट्यवधी रुपये जमा झाले होते.