न्यूजक्लिक या वेब पोर्टलने काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशचा भाग वादग्रस्त असल्याचे दाखवण्याचा अगोचरपणा केला, करोनाविरोधात भारत सरकारच्या लढ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला निधी पुरवला गेला आणि शिओमी आणि व्हिवो सारख्या चिनी टेलिकॉम कंपन्यांचा जोरदार समर्थन केले गेले, असे गंभीर आरोप न्यूजक्लिकचे संस्थापक, संपादक प्रबिर पुरकायस्थ यांच्यावर लावण्यात आले आहेत.
‘भारताच्या अखंडत्वाला बाधित करण्यासह भारतविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी परदेशी संस्थांकडून अवैध रूपात कोट्यवधी रुपये घेऊन गुंतवणूक केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी पूरकायस्थ यांच्यावर लावला आहे. भारताची एकता, अखंडत्व आणि सुरक्षेला धोका पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असाही आरोप यात करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ घोषित
तिरंदाजीमध्ये ज्योती वेन्नमला सुवर्ण; अदितीला ब्राँझ
एनएसएस स्वयंसेवकांनी लावलेली झाडे का उपटून टाकण्यात आली?
विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय!
एप्रिल २०१८मध्ये मेसर्स पीपीके न्यूजक्लिक स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडद्वारा मेसर्स मीडिया होल्डिंग एलएलसी आणि अन्य कंपन्यांकडून अवघ्या पाच वर्षांत बेकायदा पद्धतीने कोट्यवधी रुपये मिळवण्यात आले. या परदेशी निधीचा वापर शांघायमध्ये राहणारे आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचार विभागाचे सक्रिय सदस्य नेविल रॉय सिंघम यांनी अनेक संस्थांच्या माध्यमातून हे पैसे न्यूजक्लिकच्या खात्यात वळवले, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
तसेच, गौतम नवलखा हे पीपीके न्यूजक्लिक स्टुडिओ कंपनीचे एक भागधारक आहेत. नवलखा हे बंदी असेलल्या नक्षलवादी संघटनांचे समर्थन करतात. त्यांचा गुलाम नबी फई याच्यासोबत राष्ट्रविरोधी आणि बेकायदा कारवायांमध्ये सहभाग होता, असा दावाही या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. फई हा आयएसआयचा एजंट आहे.
पुरकायस्थ, सिंघम आणि सिंघम यांच्या शांघायस्थित कर्मचाऱ्यांनी ईमेलवर काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भाग भारताचा नसल्याचे दाखवण्यासंदर्भात चर्चाही झाली, असा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे. तसेच, परदेशातून मिळालेल्या निधीतून नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनालाही पैसे पुरवण्यात आले आहे. हे आंदोलन दीर्घकाळ सुरू राहावे, चिघळावे आणि सरकारी संपत्तीचे नुकसान व्हावे, असा त्यांचा प्रयत्न होता, असाही आरोप यात करण्यात आला आहे.