दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने न्यूजक्लिक आणि त्याचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्याविरुद्ध आरोपपत्रात दहशतवादी कृत्ये, बेकायदा कृत्ये, दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे आणि कट रचल्याचा आरोप केला आहे. प्रबीर पुरकायस्थ यांनी त्यांच्या न्यूज बुलेटिनमध्ये काश्मीरशिवाय भारताचे चित्र दाखवून तसेच, अक्साई चीनचा भाग चीनचा म्हणून दाखवून चीनच्या नकाशात बदल केल्याचा पुरावे असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केला आहे.
प्रबीर पुरकायस्थ, नेव्हिल रॉय सिंघम आणि इतरांवर कोविड-१९चा प्रसार रोखण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांवर टीका करण्याचा आणि भारतीय औषध कंपन्यांनी तयार केलेल्या लशींविरुद्ध लेख प्रकाशित केल्याचा आरोप आहे. आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की नागरिकत्व (सुधारणा) कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या विरोधाच्या नावाखाली, प्रबीर पुरकायस्थ न्यूजक्लिकच्या माध्यमातून अपप्रवृत्ती मोहिमेत सामील होते आणि दंगलखोरांना रोख वाटप करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही कामाला लावले होते.
दिल्ली दंगल तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भडकावण्याचा आणि अनेक दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. पुरकायस्थचे प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबासह दहशतवादी संघटनांशी सक्रिय संबंध असून त्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप या आरोपपत्रात करण्यात आला आहे. न्यूजक्लिकवर ९१ कोटी रुपये मिळाल्याचा आरोप आहे, जो नंतर दहशतवादी कारवायांसाठी वापरला गेला.
हे ही वाचा:
तामिळनाडूतील करियापट्टी येथील दगडखाणीत स्फोट!
अतिक अहमद, शहाबुद्दीन आणि मुख्तार अन्सारी यांच्या नावाने मते !
संपत्ती पुनर्वाटपाचे विचार बाळबोध आणि अज्ञानीपणाचे!
‘सॉरी पापा’ लिहीत नीटच्या परीक्षार्थी मुलाची आत्महत्या
स्पेशल सेलच्या म्हणण्यानुसार, ईमेलच्या स्वरूपात पुराव्यावरून असे सूचित होते की, सन २०१६मध्ये भारतात दहशतवादी आणि बेकायदा कृत्ये करण्यासाठी निधी उभारून कट रचण्यात आला होता. आरोपपत्रानुसार, प्रबीर पुरकायस्थ यांचे भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)शी सक्रिय संबंध होते, ज्याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले होते.
गौतम नवलखा आणि प्रबीर पुरकायस्थ यांनी माओवादी/नक्षलवाद्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या कारवायांना आर्थिक मदत केली, असे पुरावे साक्षीदारांकडून तपासात पुरावे समोर आले आहेत, असा दावा स्पेशल सेलने केला आहे.
पुरकायस्थ आणि न्यूजक्लिक यांच्यावर सीएए/एनआरसीविरुद्ध मोठ्या प्रमाणात जनमत एकत्र करण्यात, चुकीची माहिती पसरवण्याचा आणि लेख आणि व्हिडिओंद्वारे द्वेष भडकावल्याचा आरोप आहे.
दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने न्यूजक्लिक आणि त्याचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्याविरुद्ध चिनी प्रचाराचा आरोप केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांनी दखल घेऊन हे प्रकरण ३१ मे रोजी आरोपांवरील युक्तिवादासाठी सूचीबद्ध केले.
आरोपपत्राच्या प्रती आरोपींना देण्याचे निर्देश न्यायालयाने तपास संस्थांना दिले आहेत.