समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी एनसीबीची टीम उद्या येणार मुंबईत!

समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी एनसीबीची टीम उद्या येणार मुंबईत!

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे सध्या वादात सापडले असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले असून पंच प्रभाकर साईल यांनीही समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. याप्रकरणी आता समीर वानखेडे यांची चौकशी होणार असून दिल्लीहून एनसीबीचे अधिकारी मुंबईत येणार आहेत.

प्रभाकर यांनी केलेल्या आरोपानंतर या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील किरण गोसावी याचा अंगरक्षक प्रभाकर साईल याने एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. कोऱ्या कागदावर सही घेतली असल्याचा आणि प्रकरण मिटवण्यासाठी वानखेडेंना आठ कोटी मिळणार असल्याचे आरोप साईल याने केले आहेत. त्यामुळे वानखेडे यांची खाते अंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

एनसीबीच्या महासंचालकांनी आढावा बैठकीसाठी दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, दुसरीकडे एनसीबीचे पथक चौकशीसाठी दिल्लीहून मुंबईला येणार असल्याचे वृत्त आहे. उद्याच (२६ ऑक्टोबर) वानखेडे यांची चौकशी होणार असून ही जबाबदारी ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच प्रभाकर साईल यांचीही चौकशी केली जाणार आहे.

क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाला राज्यात वेगळाच राजकीय रंग चढला असून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. एनसीबीनेही प्रतिज्ञापत्र सादर करून या प्रकरणात आपली बाजू मांडली आहे.

Exit mobile version