प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्ये संबंधी ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) या विषयात चार्जशीट दाखल केली आहे. मुंबई येथील सत्र न्यायालयात ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या चार्जशीट मध्ये रिया चक्रवर्ती हिचे मुख्य आरोपी म्हणून नाव असून तिच्या सोबत इतर तेहत्तीस जणांची नावे आहेत. यात अनेक ड्रग पेडलर्स, ड्रग सप्लायर्स यांच्या नावांचा समावेश आहे.
सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात ड्रग्सचा अँगल समोर आला होता. सुशांत सिंग राजपूत याची प्रेयसी रिया चक्रवर्ती, त्याचा आचारी दीपेश सावंत आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे सुशांतच्या सांगण्यावरून त्याला ड्रग्स पुरवत होते असे एनसीबीने म्हटले आहे. या प्रकरणात एनसीबीने १२००० पानांची चार्जशीट दाखल केल्याचे समजत आहे. त्यासोबत ५०,००० पानांचे परिशिष्ट आहे.
या केसमध्ये एनसीबीने २०० पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून त्याचा समावेश चार्जशीट मध्ये करण्यात आलेला आहे. या सोबतच आरोपींचे व्हॉट्सऍप संभाषण, कॉल रेकॉर्ड्स, बँक डॉक्युमेंट्स आणि इतर पुराव्यांचा समावेश आहे. शुक्रवारी एनसीबीने चार्जशीटचे कागदपत्र दोन पेट्यांमधून न्यायालयात नेऊन चार्जशीट दाखल केली आहे.