शाहरुख खानच्या मुलाला क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर मुंबईमधील अमलीपदार्थांचा (ड्रग्स) प्रश्न पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.
गेल्या वर्षभरात मुंबई आणि आसपासच्या परिसरातून २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथक (एनसीबी) व मुंबई पोलिसांच्या कारवाईत हे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर मुंबईतील अमलीपदार्थांचे जाळे स्पष्टपणे समोर आले आहे.
गेल्या वर्षाभरातून मुंबई आणि आसपासच्या परिसरातून एनसीबीने ११४ गुन्ह्यांमध्ये ३०० आरोपींना अटक केली. त्यात ३४ नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. आरोपींकडून तब्बल १५० किलो अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान ३० किलो चरस, १२ किलो हेरॉईन, दोन किलो कोकेन, ३५० ग्रॅम गांजा, २५ ग्रॅम मेफेड्रोन यांचा समावेश आहे. २०२१ मध्ये आतापर्यंत एनसीबीने ९४ गुन्हे दाखल केले आहेत.
हे ही वाचा:
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!
… आणि म्युकरमायकोसिसमुळे बसवावा लागला कृत्रिम जबडा
वर्षभरात मुंबई पोलिसांनी सुमारे ७८ कोटींचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. मुंबई पोलिसांनी चार हजार २७४ गुन्हे दाखल करून चार हजार ४१२ अमलीपदार्थ विक्रेते आणि सेवनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत मुंबई पोलिसांनी १२ गुन्ह्यांमध्ये आठ कोटी १० लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. ३० गुन्ह्यांमध्ये १२ कोटी २७ लाख रुपयांचे चरस, नऊ कोटी ५७ लाख रुपयांचे कोकेन, सहा कोटी ७८ लाख रुपयांचा गांजा, २५ कोटी २१ लाख रुपयांचे एमडी असे मुंबईतून जप्त करण्यात आले आहे.