भारतातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांपैकी एक मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली येथे तेलतुंबडेला कंठस्नान घालण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत तेलतुंबडे ठार झाल्याचे म्हटले जात आहे.
नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल २६ नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.
हे ही वाचा:
पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका
चार टक्के व्याजावर पालिकेचे ‘बेस्ट’ कर्ज
या कारवाईत नक्षलवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे याला ठार करण्यात आल्याचे समजत आहे. दरम्यान या संबंधितली कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी देखील या कारवाईत मिलिंद तेलतुंबडे मारला गेल्याच्या वृत्ताला पुष्टी दिलेली नाही.
कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?
मूळचा वणी येथील रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे हा भारतातील वॉन्टेड नक्षलवाद्यांपैकी एक होता. लेखक, प्राध्यापक असलेले आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद हा लहान भाऊ. गेली अनेक वर्ष तो भाकपा माओवादी या बंदी असलेल्या संघटनेचा सभासद असून महाराष्ट्राचा सचिव म्हणून तो कामकाज पाहत होता.