७५ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा छत्तीसगडमध्ये खात्मा

चकमकीत तीन नक्षलवादी ठार

७५ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा छत्तीसगडमध्ये खात्मा

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. नारायणपूर जिल्ह्यात सोमवारी ही चकमक झाली. यात दोन पुरुष आणि एक महिला असे तीन नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून त्यातील एकाची ओळख पटली आहे. रुपेश मडावी असे त्याचे नाव आहे.

नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समिती सदस्य आणि कंपनी १० चा कमांडर रुपेश मडावी याची नक्षलवादी चळवळीतील प्रमुख नक्षल नेता म्हणून त्याची ओळख होती. त्याच्यावर ७५ लाखाहून अधिक बक्षीस होते. २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती.

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात अबुझमाड जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे छत्तीसगड पोलिसांनी त्या भागात अभियान राबविण्यास सुरुवात केली. दुपारी ४ च्या सुमारास पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. यात दोन पुरुष आणि एक महिला असे तीन नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. त्यातील एकाची ओळख पटली असून रुपेश मडावी असे त्याचे नाव आहे. या चकमकीत पोलिसांनी घटनास्थळावरुन एक एके ४७ बंदूक आणि अन्य स्फोटक साहित्यही जप्त केले आहे.

हे ही वाचा : 

तिरुपती लाडूत तंबाखू असल्याचा भक्ताचा दावा मंदिर समितीने फेटाळला!

दुकानं, हॉटेल्सवर मालकाचे नाव हवेचं; सीसीटीव्हीही बंधनकारक

कट्टरवादी संघटना ‘हिजबूत- तहरीर’संबंधी एनआयएकडून तामिळनाडूमध्ये छापेमारी

अमेरिकेतील भारतीय वंशांच्या ज्वेलर्सनी बनविली पंतप्रधानांची ‘हिऱ्यांची प्रतिमा’

रुपेश मडावी हा गेली २५ वर्षे गडचिरोलीच्या नक्षलवादी चळवळीत सक्रिय होता. अहेरी तालुक्यातील देचलीपेठा पोलीस हद्दीत येणाऱ्या शेडा या गावातील रहिवासी होता. त्याच्यावर हत्या, जाळपोळसह ७० हून अधिक गुन्हे दाखल होते. त्याच्यावर तीन राज्यात ७५ लाखांहून अधिक बक्षीस होते. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भामरागड तालुक्यातील कोठी येथील मतदान केंद्रावर नक्षल्यांनी पोलिसांवर बीजीएलचा मारा केला होता. त्यात रुपेशचा सहभाग होता, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

Exit mobile version