छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल झालेल्या सुरक्षा बल आणि नक्षल्यांच्या चकमकीत २० जवान हुतात्मा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर अचानक हल्ला केला. तब्बल तीन तास चाललेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे वीस जवान शहीद झाल्याची माहिती आहे तर काही जवान जखमी झाले असल्याचं सांगितलं जात आहे.
काल दुपारी १ वाजता बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सुरक्षा बलाच्या जवनांचा संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबविण्यात आले होते. मात्र या दरम्यान तर्रेम-जोनागुडा जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी सुरक्षा बलाच्या जवानांवर ताबडतोब गोळीबार सुरू केला. ही चकमक तब्बल ३ तास चालली. मात्र या दरम्यान सुरक्षा बलाचं मोठं नुकसान झाले. काल ५ जवान शहीद झाले होते, तर १२ जखमी झाले होते आणि २१ जवान बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आता धक्कादायक माहिती पुढे येत असून चकमकीत वीस जवान शहीद झाले आहेत तर अजून काही बेपत्ता आहेत. तर घटनास्थळी अजून ही जवानांचे मृतदेह पडून असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्च स्तरीय बैठक
लसीकरणाला प्रोत्सहन देणारे अनोखे उपाय
लॉकडाऊन करू नका, सदाभाऊ खोत यांची राज्यपालांना विनंती
शुक्रवारी रात्री छत्तीसगड राज्यातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे (सीआरपीएफ) कोबरा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केलं होतं. या नक्षलवादी विरोधी अभियानात जवळपास दोन हजार जवान सामील होते. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक हल्ला केला. ही चकमक सुमारे तीन तास सुरू होती.
नक्षलवाद्यांच्या या निर्घृण कृत्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.