सध्या मनीलॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मूत्रपिंडासंदर्भातील उपचाराची न्यायालयाने परवानगी दिली आहे. खरे तर गेल्या महिन्यातच न्यायालयाने मलिक यांना या उपचारासाठी परवानगी दिली होती पण मलिक यांना ताप आणि इतर काही त्रास असल्यामुळे ते उपचार होऊ शकले नव्हते.
मूत्रपिंडाचे स्कॅनिंग मलिक यांना करायचे आहे. त्याद्वारे मूत्रपिंडाचा आकार, त्याचे कार्य यासंदर्भातील माहिती मिळते. शिवाय, मूत्रपिंडाला रक्तपुरवठा कसा होतो आहे, यासंदर्भातही माहिती मिळते.
याचदरम्यान ईडीच्या वकिलांनी मलिक यांच्या जामिन अर्जाला विरोध केला. ते बरेच दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृताविषयी तपासणीसाठी एक वैद्यकीय समिती तयार करण्यात यावी.
हे ही वाचा:
अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर
‘राहुुल गांधी यांनी अखंड भारत यात्रा काढावी तिही पाकिस्तानातून’
डिमॅट खात्यांनी ओलांडली १० कोटींची संख्या
उमाजी नाईकांनी इंग्रजांविरोधात प्रसिद्ध केला होता जाहीरनामा
मंगळवारी मलिक यांनी मूत्रपिंडाच्या चाचणीसाठी विनंती केली होती. ईडीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी ही विनंती स्वीकारली आणि त्यांना परवानगी दिली. आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध करण्यात आली. २३ फेब्रुवारीला ईडीने गॅँगस्टर दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात मलिक यांना अटक केली आहे. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थर रोड तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले असले तरी सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.
न्यायालयाने आपल्या परवानगीच्या आदेशात म्हटले आहे की, १० ऑगस्टला त्यांना या चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती, पण त्यांनी ताप आणि इतर आजार असल्यामुळे चाचणी केली नव्हती. आता १२ सप्टेंबरला त्यांना घाटकोपर येथील सर्वोदय रुग्णालयाच्या परिसरातील चाचणी केंद्रात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या चाचणीचा संपूर्ण खर्च मलिक यांनीच करायचा आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.