नवज्योत सिद्धू १० महिन्यांनी तुरुंगातून बाहेर

मारहाण प्रकरणी झाली होती १ वर्षाची शिक्षा

नवज्योत सिद्धू १० महिन्यांनी तुरुंगातून बाहेर

माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिद्धू आज शनिवारी तुरुंगातून बाहेर येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १९ मे रोजी हाणामारी प्रकरणात एकाचा मृत्यू झाला होता त्यासंदर्भात सिद्धू यांना १ वर्षाची शिक्षा झाली होती.

पतियाळा येथील सेंट्रल जेलमध्ये सिद्धू यांना ठेवण्यात आले होते. पण आता १० महिने तुरुंगात काढल्यावर त्यांना सोडण्यात येणार आहे. २ महिने आधीच त्यांना बाहेर येण्याची मुभा मिळाली आहे. तुरुंगातील वर्तन चांगले असल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. पतियाळा तुरुंगाच्या बाहेर सिद्धू पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते हजर राहणार आहेत आणि सिद्धू यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. १९८८च्या या प्रकरणात सिद्धू यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती.

हे ही वाचा:

अजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?

फाटक इन्चार्ज दारू प्यायला वांगणीला, प्रवाशांचा जीव तासभर टांगणीला

घर खरेदी करा जुन्या रेडीरेकनर दरानेच

बुलंदशहरमध्ये शेतात बांधलेल्या घरात भीषण स्फोट, चार जणांचा मृत्यू

हे प्रकरण काय होते?

२७ डिसेंबर १९८८मध्ये सिद्धी आपले मित्र रुपिंदर संधू यांच्यासह पतियाळा येथील शेरावाले गेट येथील मार्केटमध्ये गेले होते. तेव्हा तिथे पार्किंग करताना त्यांचा ६५ वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी वाद झाला. ते प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत पोहोचले. तेव्हा सिद्धू यांनी गुरनाम सिंह यांना ढोपराने मारले. गुरनाम खाली पडले. मार लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन अहवालात हे स्पष्ट झाले की, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. पण सिद्धू आणि त्यांचे मित्र संधू यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यावर न्यायालयात खटला सुरू झाला. १९९९ला हा खटलाच सत्र न्यायालयाने रद्द केला. पण खटला उच्च न्यायालयात गेल्यावर २००६ला सिद्धू यांना दोषी धरण्यात आले आणि प्रत्येकी ३ वर्षांची शिक्षा दोघांनाही ठोठावण्यात आली. शिवाय १ लाखाचा दंडही ठोठावण्यात आला. मग हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला. तिथे सिद्धू आणि संधू यांना आरोपातून मुक्त करण्यात आले पण १ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. त्यावर मग पुनर्विचार याचिका दाखल केली गेली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली.

Exit mobile version