महाराष्ट्रतील नाशिक जिल्यात गुन्हेगारी प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.आता चक्क चोरटयांनी केंद्रीय मंत्र्यांच्या आईचं मंगळसूत्र चोरल्याची घटना नाशिक शहरात घडली.केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.एकीकडे सामान्य जनता सुरक्षित नाहीच तर दुसरीकडे मंत्री महोदयांचे कुटुंबीय देखील सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल या आरटीओ परिसरामध्ये राहतात. तिथे जवळ असलेल्या भाजी बाजारात काल सायंकाळी त्या भाजी घेण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी नाशिकच्या आरटीओ (RTO) परिसरात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन ते अडीच तोळ्याची सोनसाखळी हिसकावत पळ काढला. या घटनेनंतर नागरिक देखील मोठ्या संख्येने जमा झाले होते. मंत्र्यांच्या आईची सोनसाखळी चोरी गेल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता.
हे ही वाचा:
देवेंद्र फडणवीसांबद्दल खालच्या पातळीतील भाषा सहन करणार नाही
रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’
मोदी सरकारच्या कार्यकाळात बँकिंग क्षेत्रात सुधारणा
‘फलाटावरील प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली नसती तर तो वाचला असता!’
अशा परिस्थितीत शांताबाई बागुल या प्रचंड घाबरल्या होत्या, त्यांनी तात्काळ म्हसरूळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. घटनास्थळावरून संशयित फरार झाले असून अद्यापही ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. नाशिक जिल्यातील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पोलिसांसह नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. नाशिक जिल्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांचा धाक नसलेला पाहायला मिळत असून पोलिसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिक गुन्हेगारीबाबत काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती.