पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (वय ४८) यांची शुक्रवार, १२ मे रोजी नगरपरिषद कार्यालयाच्या समोर निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर आवारे यांच्या आईने ही तक्रार नोंदवली आहे. किशोर आवारे यांच्या कुटूंबियांनी आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावावर किशोर आवारे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. आमदारांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. किशोर आवारे यांचे राजकीय विरोधक असलेले सुनिल शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत होती. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून किशोर नेहमी आमदार सुनिल शेळके यांचे भाऊ सुधाकर शेळके यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे सांगितल्याचे किशोर यांच्या आईने स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर ते याच लोकांपासून होईल हेही सांगितल्याचे त्यांच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. किशोर यांनी स्वतःचा वेगळा गट तयार करून सुनिल शेळके यांना गेल्या दोन वर्षापासून राजकीय विरोध केलेला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील करत आहेत.
किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात कामानिमित्त आले होते. कार्यालयातून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. आधी त्यांच्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले गेले. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली.
हे ही वाचा :
आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील नाले सफाईची पाहणी
“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”
“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”
वाढताहेत उन्हाच्या झळा, मुंबईकरांनो पुढील दोन दिवस तब्येत सांभाळा!
किशोर आवारे हे पिंपरी चिंचवड येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. करोना साथरोग, कोल्हापूर आणि चिपळूण पूर आदी आपत्कालीन परिस्थितीत आवारे यांनी स्वखर्चातून उल्लेखनीय मदतकार्य केले होते.