नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या आधी आणि नंतर सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांवर नागपूर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करत आहे. अशा अनेक अकाउंट्स आणि त्यांच्या वापरकर्त्यांची ओळख पटवली जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे. बुधवारपर्यंत (१९मार्च ) ६ एफआयआर नोंदवण्यात आले होते पण आता नागपूर पोलिसांनी एकूण १० एफआयआर नोंदवले आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणे आणि चिथावणी देणे यासाठी नवीनतम ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने बांगलादेशातून चालवले जाणारे एक फेसबुक अकाउंट ओळखले आहे, ज्याने नागपुरात मोठ्या प्रमाणात दंगली भडकवण्याची धमकी दिली होती. ही धोकादायक पोस्ट एका बांगलादेशी वापरकर्त्याने केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की ‘सोमवारची दंगल ही फक्त एक छोटीशी घटना होती आणि भविष्यात मोठ्या दंगली होतील.’ तपासात असे आढळून आले की सदर अकाउंट चालवणारी व्यक्ती बांगलादेशची रहिवासी आहे आणि त्याने हा संदेश बांगलादेशातून पोस्ट केला होता. सायबर सेलने फेसबुकशी संपर्क साधला आहे आणि ते अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती केली आहे.
सोशल मीडियाचा वापर केवळ द्वेष पसरवण्यासाठीच होत नाही तर त्याद्वारे अफवा देखील पसरवल्या जात आहेत. गेल्या दोन दिवसांत, अनेक पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की दंगलीत जखमी झालेल्या दोन लोकांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. सायबर सेलने आतापर्यंत अशा ९७ पोस्ट ओळखल्या आहेत, ज्या द्वारे चुकीची माहिती पसरवली जात होती.
नागपूर शहर पोलिसांनी दंगलीत सहभागी असलेल्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी १८ विशेष तपास पथके (एसआयटी) स्थापन केली आहेत. आतापर्यंत पोलिसांनी २०० जणांची ओळख पटवली आहे आणि आणखी १,००० संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दंगलीच्या वेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे संशयित कैद झाले होते. या फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे विशेष पोलिस पथके आरोपींना लवकरच अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा :
‘छावा’च्या ठिणगीने वणवा पेटलाय !
दिशा सालियन हत्या प्रकरण आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या अंगाशी येणार?
नागपूर हिंसाचार: विहिंप आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण!
नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत ९० जणांना अटक करण्यात आली आहे. विहिंप आणि बजरंग दलाच्या आंदोलनावेळी जाळण्यात आलेल्या औरंगजेबाच्या प्रतिकृतीवर हिरवे कापड होते, या कापडावर धार्मिक मजकूर होता असा आरोप मुस्लिम संघटनांकडून करण्यात आला होता. या हिरव्या कापडावर धार्मिक मजकूर होता का? हे तपासण्यासाठी मौलाना आणि तज्ञांची मदत घेण्यात आली. मात्र, त्या कापडावर कोणतेही धार्मिक शब्द किंवा विधान नव्हते. मुळात म्हणजे, विहिंप आणि बजरंग दलाने स्पष्ट केले होते की जाळण्यात आली हे एक जुने हिरव्या रंगाचे कापड होते, त्यावर कोणताही धार्मिक मजकूर नव्हता. दरम्यान, नागपूर हिंसाचारानंतर परिसरात दोन दिवसांसाठी कर्फ्यू आहे, जो गुरुवारी सुरक्षा आढावा घेतल्यानंतर शिथिल केला जाऊ शकतो.