उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेल्या निवडणुकांनंतर त्यात भारतीय जनता पार्टीला मिळालेले यश साजरे करणाऱ्या एका मुस्लीम युवकाला त्याच्या शेजाऱ्यांनी ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २० मार्चला ही घटना घडली आहे. बाबर अली असे या युवकाचे नाव असून त्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या रुग्णालयात त्याचा २५ मार्चला मृत्यु झाला.
पोलिसांनी यासंदर्भात तपास करत आरिफ आणि ताहीर या दोन मुलांना अटक केली आहे. इतरांचाही शोध जारी आहे.
कुशीनगर जिल्ह्यातील कटघरही गावात ही घटना घडली. भाजपाचा विजय झाल्याबद्दल बाबर अली आनंद साजरा करत होता आणि मिठाई वाटत होता. त्याचा राग येऊन त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला जबर मारहाण केली. तेव्हा त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर लखनऊ रुग्णालयात दाखल केले गेले. पण तिथे त्याचा मृत्यु झाला.
बाबरचा मृतदेह गावात आणल्यानंतर स्थानिकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. ही बातमी जिल्हा प्रशासनाला कळल्यानंतर हे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. भाजपाचे आमदार पी.एन. पाठकही तिथे गेले. स्थानिकांची समजूत घातल्यानंतर बाबर अलीच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची परवानगी दिली.
हे ही वाचा:
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची हिजाबच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात धाव
लवकरच मुंबई होणार शंभर टक्के लसवंत!
बंगाल विधानसभेत ठोसे, शर्ट फाटेपर्यंत मारामारी
‘अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर उद्धव साहेबांनी विचार करायला हवा’
बाबर अलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, बाबर भाजपाचा विजय साजरा करत असल्यामुळे शेजारी त्याच्यावर चिडले होते. याआधीही बाबर अलीने भाजपासाठी काम केले होते. त्यावेळीही त्याला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्याने स्थानिक पोलिसांकडे सुरक्षेची मागणीही केली होती. पण त्याला ती सुरक्षा देण्यात आली नाही. अखेर शेजाऱ्यांनी त्याला जबर मारहाण केली आणि छतावरून खाली फेकले. बाबर अलीच्या पत्नीने रामकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.