उत्तर प्रदेश पोलिसांनी गाझियाबादजवळील दसना देवी मंदिरात हिंदू असल्याचे भासवून प्रवेश करणाऱ्या तीन मुस्लीम तरुणांना अटक केली आहे. राहुल, नानक आणि वजीर खान अशी त्यांची नावे असून ते मूळचे मथुरा जिल्ह्यातील आहेत. या तिघांनी हिंदू नावांचा वापर केला तसेच पुजारी यती नरसिंहानंद यांच्या नेतृत्वाखालील रामलीलाचा भाग असल्याचा दावा त्यांनी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी केला, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना एसीपी लिपी नागायच यांनी माहिती दिली की, “तपासणीदरम्यान, मंदिरातील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना आढळले की हे तीन तरुण मुस्लीम असूनही ते हिंदू नावांचे आधार कार्ड वापरत आहेत. ते रामलीला कार्यक्रमासाठी तेथे पोहोचले होते. चौकशीनंतर, या तरुणांना अटक करण्यात आली. तोतयागिरी करून फसवणूक केल्याबद्दल आणि प्रार्थनास्थळ अपवित्र केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मंदिरात रामलीला करणाऱ्या गटाला हे तरुण मुस्लिम आहेत हे माहित नव्हते,” अशी माहिती त्यांनी दिली.
भारतीय न्याय संहिता कलम २९८ (पूजेचे ठिकाण अपवित्र करणे) आणि ३१९ (२) (तोतयागिरी करून फसवणूक) अंतर्गत गुरुवारी तीन मुस्लिम तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुस्लिमांना दसना देवी मंदिरात प्रवेश करण्यास मनाई असून हे तरुण काही गैरप्रकार घडवण्यासाठी आले होते आणि पोलिसांनी त्यांना वेळीच अटक केली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
हे ही वाचा:
स्त्री शक्तीचा जागर: स्वराज्याची रणरागिणी महाराणी ताराबाई
जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांशी संबंधित एनआयएकडून पाच राज्यांत छापेमारी
पवारांनी लावली ७५ टक्के आरक्षणाची काडी
यापूर्वी २०२३ मध्ये मोहसीन नावाच्या व्यक्तीला दोन अल्पवयीन मुलींसह दासना देवी मंदिरात घुसल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते. एक अल्पवयीन मुलगी हिंदू होती तर दुसरी मुस्लिम होती. या तिघांनी हिंदू मुलीचे आधार कार्ड वापरून मंदिरात प्रवेश केला होता.