संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले असून गेले काही दिवस यावरून राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला होता. आरोप- प्रत्यारोप केले जात होते. अशातच उत्तर प्रदेशातील संभलमध्ये, एका मुस्लिम वृद्धाला वक्फ सुधारणा विधेयकाचे समर्थन केले म्हणून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींवर कारवाई करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
उत्तर प्रदेश अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अशफाक सैफी यांचे मेहुणे आणि भाजप समर्थक जाहिद सैफी हे संभल जिल्ह्यातील गुन्नौर कोतवाली भागातील रहिवासी आहेत. गुरुवारी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास जाहिद सैफी हे शहरातील अबू बकर मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गेले होते. नमाज अदा केल्यानंतर जेव्हा ते मशिदीतून बाहेर आले तेव्हा ते तेथील काही लोकांसोबत वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करत होते. यावेळी उपस्थित काही लोकांनी हे विधेयक चुकीचे असल्याचे म्हटले परंतु जाहिद सैफी यांनी त्यांचे म्हणणे खोडत वक्फ दुरुस्ती विधेयक योग्य असल्याचे ठामपणे सांगत समर्थन केले.
यानंतर घटनास्थळी असलेल्या रिजवान, नौशाद आणि शोएबसह काही लोकांनी जाहिद सैफी यांच्यावर काठ्यांनी हल्ला केला. शिवाय धारदार शस्त्रानेही हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेत जाहिद सैफी गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. इतर काही लोकांनी जाहिद यांना जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात नेले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही बाब पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच सीओ दीपक तिवारी यांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाठवले आणि तपास केला, परंतु तोपर्यंत आरोपी पळून गेले होते.
हे ही वाचा :
“वक्फ सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे देशासाठी ऐतिहासिक क्षण”
लोकसभेनंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर
एआय स्वीकारण्यात भारत दक्षिण आशियाचे नेतृत्व करणार
“पूल शॉटचा अंदाज चुकला, कोहलीचा खेळ संपला!
गुन्नौर कोतवाली पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. जाहिद सैफी म्हणाले की, जेव्हा मी नमाज अदा करून निघत होतो तेव्हा माझ्याशी गैरवर्तन करण्यात आले आणि मला सांगण्यात आले की मी आता मुस्लिम नाही तर हिंदू झालो आहे. पण वक्फ विधेयक मंजूर झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. या विधेयकामुळे जे माफिया आहेत आणि जे वक्फ बोर्डाची लूट करत आहेत त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर, गरीब मुस्लिम लोकांना त्यांचे हक्क मिळतील.