छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात एका पत्रकाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा पत्रकार तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. एका कंत्राटदाराच्या आवारातील सेप्टिक टँकमधून पोलिसांनी पत्रकाराचा मृतदेह बाहेर काढला.
छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश चंद्राकर हे एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये काम करत होते. शुक्रवार, ३ जानेवारी रोजी बिजापूर जिल्ह्यात मुकेश हे मृतावस्थेत आढळले. धक्कादायक बाब म्हणजे मुकेश यांनी बस्तरमधील १२० कोटी रुपयांच्या रस्ते बांधकाम प्रकल्पातील कथित घोटाळा समोर आणला होता. हा घोटाळा समोर आल्यानंतर सरकारने कंत्राटदाराच्या कारभाराची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर बेपत्ता झालेल्या पत्रकाराचा मृतदेह सापडला आहे.
मुकेश १ जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होते. त्यांचा मोठा भाऊ युक्रेश चंद्राकर यांनी मुकेश यांचा फोन सतत बंद दाखवत असल्याचे तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनच्या आधारे मुकेश हे कंत्राटदाराच्या आवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. अखेर शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सेप्टिक टँकमधून मुकेश यांचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहावर ८-१० ठिकाणी जखमा आढळल्या. पत्रकाराची निघृण हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. डोक्याच्या मागच्या बाजूलाही जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. हत्येनंतर मृतदेह सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला होता. यानंतर कोणाला त्याचा सुगावा लागू नये म्हणून त्यावर प्लास्टरिंग करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी सेप्टिक टँकचे फ्लोअरिंग तोडले तेव्हा आतमध्ये मृतदेह सापडला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “पीडित व्यक्तीच्या भावाने काल आम्हाला कळवले की मुकेश १ जानेवारीपासून बेपत्ता आहेत. आम्ही कारवाई सुरू केली, सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि त्याचे शेवटचे लोकेशन देखील सापडले. त्यानंतर आम्हाला एका टाकीमध्ये मुकेशचा मृतदेह सापडला.”
हे ही वाचा :
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील तीन पैकी दोन फरार आरोपींच्या आवळल्या मुसक्या
सिडनी कसोटीत न खेळणाऱ्या रोहित शर्माने अखेर घेतला निर्णय!
मराठी भाषेत बोलण्याची विनंती करणाऱ्या तरुणाला माफी मागण्यास भाग पाडणाऱ्यांविरोधात गुन्हा
दिल्ली झाली ‘गायब’, धुक्यामुळे दिसेनासे झाले
माहितीनुसार, बस्तरची कॉन्ट्रॅक्टर लॉबी सरकारी करार सुरक्षित करण्यासाठी प्रभाव आणि कथित मोबदला वापरण्यासाठी कुख्यात आहे. अनेकदा धमक्या किंवा हिंसाचाराद्वारे विरोधाचा आवाज बंद केला जातो. या प्रदेशातील भ्रष्टाचाराचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना वारंवार छळवणूक आणि धमकीचा सामना करावा लागतो. बिजापूर पोलिसांनी मुकेशच्या मृत्यूला दुजोरा दिला असून सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले आहे.