आंतरजातीय विवाहातून अँटॉप हिल येथे एकाची निर्घृण हत्या 

आंतरजातीय विवाहातून अँटॉप हिल येथे एकाची निर्घृण हत्या 

‘दत्तक वस्ती योजना’ राबवणाऱ्या एकावर मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री सायन कोळीवाडा येथे घडली. ही हत्या आंतरजातीय विवाहाच्या वादातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी त्याच परिसरातील दोघांविरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

वसंत आरमोगम देवेन्द्र (३१) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वसंत हा सायन कोळीवाडा, कोकरी आगार येथील म्हाडा वसाहत या ठिकाणी राहण्यास होता. वसंत देवेंद्र त्याच परिसरात दत्तक वस्ती योजना अंतर्गत नाले सफाईचे कामे करत असे. वसंत याने इमारतीत रहाणाऱ्या रहिवाश्यांसाठी रविवारी जेवणाच्या कार्यक्रम ठेवला होता.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर?

सेंट्रल व्हिस्टावर आक्षेप घेणाऱ्या याचिकादारांना १ लाखाचा दंड

दोन दिवसांत ठरणार सीबीएसई, आयसीएसई बारावीच्या परिक्षांचे भवितव्य

ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते

रात्री साडे दहा वाजण्याच्या जेवणाचा कार्यक्रम संपल्यानंतर वसंत हा पत्नी आणि काही नातेवाइकासोबत मंडपात बसलेला असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी वसंत याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली, हा प्रकार बघून पत्नी आणि नातेवाइकानी मदतीसाठी रहिवाश्याना बोलावले मात्र तो पर्यत मारेकरी वसंतला जखमी करून पळून गेले होते.

जखमी  वसंतला ताबडतोब उपचारासाठी सायन रुग्णालयत आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून वसंतला मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला असता हल्लेखोर हे त्याच परिसरात राहणारे असून त्यापैकी बाला नाडर हा मुख्य आरोपी आहे. बाला नाडर याच्या भाचीचे वर्षभरापूर्वी वसंतच्या मेव्हुण्यांसोबत लग्न झाले होते, मात्र हे लग्न आंतरजातीय असल्यामुळे बाळा याला मान्य नव्हते, यामुळे त्याच्या मनात लग्न लावून देणारा वसंत देवेंद्र याच्याबाबत राग होता या वादातूनच वसंतची हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय पाटील दिली.

Exit mobile version