वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचा जामीन अर्ज मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आपण निर्दोष असून कुठलाही गुन्हा केला नसल्याचा फारुकीचा दावा न्यायालयाने मान्य केलेला नाही. मुनव्वर फारुकी याच्यावर स्टॅन्ड अप कॉमेडीच्या माध्यमातून हिंदू देवी – देवतांचा अपमान केल्याचा आरोप आहे.
फारुकी यांनी कोणताही गुन्हा केला नाही हे अजूनही सिद्ध झाले नसून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने गुन्हा सिद्ध करणारे पुरावे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही असे कोर्टाने म्हटले आहे. फारुकी याच्या विरोधात उत्तर प्रदेशातही अशाच प्रकारचा खटला सुरु असल्याची आणि फारुकीच्या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट्सचीही न्यायालयाने दाखल घेतलीआहे.
कार्यक्रमाच्या आयोजकांनी केलेल्या निमंत्रणामुळे मुनव्वर फारुकी कार्यक्रमाला उपस्थित राहिला पण त्याने कोणताही आक्षेपार्ह विनोद केला नाही असा युक्तिवाद फारुकीच्या वकिलांनी केला, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. फारुकीचा जामीन अर्ज फेटाळला जाण्याची ही तिसरी वेळ आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
१ जानेवारी रोजी इंदोरमधील एका कॅफे मध्ये एक स्टॅन्ड अप कॉमेडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुनव्वर फारुकीने सादरीकरण केले. तक्रारदार एकलव्य सिंग गौर हा कार्यक्रम पाहायला गेला होता. त्यावेळी कार्यक्रमात हिंदू देवतांबद्दलची आक्षेपार्ह वक्तव्य ऐकून गौर आणि त्यांच्या सहकार्यांनी हा कार्यक्रम बंद पाडला. त्या नंतर स्थानिक पोलीस ठाण्यात फारुकी आणि इतर चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. एडविन ऍंथोनी, प्रभाकर व्यास, प्रियम व्यास आणि नलिन यादव अशी या चौघांची नावे आहेत.