महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्याचा गुन्हा ठरताना दिसत असून मराठीला उघडपणे विरोध करण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला या व्यक्तीने मराठी कुटुंबाला गुंडांकरवी मारहाण केल्याची घटना घडली होती. शिवाय मराठी लोकांबद्दल अर्वाच्य भाषेत भाष्यही केले होते. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त झाल्यानंतर शुक्ला याला अटक करण्यात आली होती. अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. अशातच आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी असा वाद समोर आला आहे. मराठी बोलायला सांगितले म्हणून एका तरुणाला जमावाने दमदाटी करत माफी मागायला भाग पडल्याची घटना घडली आहे.
डायघर भागात राहणारा २१ वर्षीय तरुण गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा भागात फळ विक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला. त्यामुळे मराठी बोला असे तो तरुण फळ विक्रेत्याला म्हणाला. महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे मी मुंब्रा बंद करुन टाकेन असं वक्तव्य या तरुणाने केले. पुढे फळ विक्रेता आणि तरुणामध्ये वाद झाला. या वादानंतर फळ विक्रेत्याने त्याच्या सहकाऱ्यांना बोलावले आणि त्यांनी या तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. तसेच तो माफी मागत असल्याचे चित्रीकरणही प्रसारित केले. विशेष म्हणजे याप्रकरणी मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या मराठी युवकास मुंब्रा येथील जमावाने शिवीगाळ केली आहे. या घटनेनंतर फळ विक्रेता मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला. तसेच त्या तरुणाविरोधात त्याने तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर त्यांनी तरुणा विरोधात घोषणाबाजी केली.
हे ही वाचा :
रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे मृत झालेला रुग्ण झाला जिवंत!
अमेरिका हल्ल्यातील संशयित आयएसआयएसशी संबंधित; अमेरिकेच्या लष्करातही केले होते काम
मदरशाच्या नावाखाली मुबारक अलीकडून खोट्या नोटा छापण्याचे काम!
मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत आणि प्रवीण कुमारला खेलरत्न!
विशाल गवळी असे तरुणाचे नाव असून त्याला आईने फळं आणायला पाठवले होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल होत असून यामुळे पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. तर, मनसचे नेते अविनाश जाधव यांनी तरुण माफी मागत असल्याचा व्हिडिओ प्रसारित करत प्रतिक्रिया दिली आहे. “मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागतीये तेही महाराष्ट्रात! हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार, आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील. याचसाठी महाराष्ट्राला राज साहेब हवे होते. आता भोगा कर्माची फळ” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.