वाझे म्हणतो, मला घरीच नजरकैदेत ठेवा!

वाझे म्हणतो, मला घरीच नजरकैदेत ठेवा!

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने शस्त्रक्रियेनंतर आपल्याला घरीच नजरकैदेत ठेवावे अशी मागणी केली आहे. १३ सप्टेंबरला वाझेवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली, त्यानंतर त्याने घरीच ठेवण्यात यावे अशी याचिका केली आहे.

५२ वर्षीय वाझेच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने परवानगी दिली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले.

आता वाझेने केलेल्या याचिकेनुसार शस्त्रक्रियेनंतर तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात आल्यास आणखी बाधा होऊ शकतात, हे लक्षात घेऊन घरीच नजरकैदेत ठेवण्याची विनंती त्याने केली आहे.

यासंदर्भात आता एनआयए न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला २९ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले असून त्या दिवशी सुनावणी होईल.

वाझेच्या याचिकेत असेही म्हटले आहे की, वाझेला मुंबईतील त्याच्या रुग्णालयाला भेट देण्याची परवानगी मिळावी तसेच तुरुंगाच्या नियमानुसार त्याला आपल्या वकिलांना भेटण्याचीही मुभा असावी.

हे ही वाचा:

गोव्यात काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने का दिली पक्षाला सोडचिट्ठी?

‘भारताला आणखी चार-पाच स्टेट बँक हव्यात’

भारत बंद म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार

आता आरटीओत न जाताच या संस्थांकडून मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स

 

तळोजा मध्यवर्ती तुरुंगातील वैद्यकीय सुविधा पुरेशा सक्षम नसल्याचे निरीक्षण एल्गार परिषद प्रकरणातील वरवरा रावसंदर्भात नोंदविल्यानंतर त्याच आधारावर रावला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्याच परिस्थितीला समोर ठेवून वाझेनेही आपल्याला सुरक्षित वातावरणात राहण्याची परवानगी मागितली. तळोजाच्या तुरुंगात ठेवण्याऐवजी घरात नजरकैदेत ठेवल्यास आपल्या प्रकृतीला लवकर आराम पडेल, स्वच्छ आणि तणावमुक्त वातावरणात राहता येईल, असे वाझेने म्हटले आहे.

Exit mobile version