मुंबई पोलीस बनले झोमॅटो डिलीव्हरी बॉय, दोघांना केली अटक

मुंबई पोलीस झोन १२ चे पोलीस उपायुक्त (डीसीपी) सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.

मुंबई पोलीस बनले झोमॅटो डिलीव्हरी बॉय, दोघांना केली अटक

बॉलीवूडच्या चित्रपटांत दाखवतात अश्या प्रकारे मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन चैन स्नेचर’ मध्ये चक्क झोमॅटो डिलीव्हरी बॉय बनून दोन सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दोघांवर मुंबईत दोन डझनपेक्षा अधिक चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत.

मुंबई पोलीस झोन १२ चे पोलीस उपायुक्त (डीसीपी) सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले की, जुलै आणि ऑगस्टमध्ये कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात ३ आणि बांगूर नगर पोलिस ठाण्यात चेन स्नॅचिंगच्या १ अश्या घटनेची नोंद झाली आहे.

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी ओम तोटावार आणि राहुल वाळुस्कर यांच्या पथकाने सोनसाखळी चोरांच्या शोधासाठी शहरातील ३०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कल्याण येथील आंबिवली रेल्वे स्थानकावर उभी असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलीस उपायुक्त घार्गे म्हणाले की पोलिसांना खात्री होती की आरोपी त्यांची दुचाकी परत घेण्यासाठी येतील.

त्यानंतर, कस्तुरबा पोलिसांच्या संपूर्ण पथकाने झोमॅटो डिलिव्हरी बॉईजचे पोशाख परिधान केले आणि विठ्ठलवाडी आणि आंबिवलीच्या आसपास सुमारे ३ दिवस थांबून राहिले, एक आरोपी त्यांची दुचाकी घेण्यासाठी आला असता, पोलिसांनी दुचाकीचा प्लग काढून घेतल्याने तो पळून जाऊ शकला नाही. अन्य आरोपीला नंतर पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून दोन दुचाकी आणि चोरीच्या सोनसाखळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

डीसीपी म्हणाले की, ते अत्यंत हुशार चोर आहेत. गुन्हा केल्यानंतर ते आंबिवली पूर्व येथे दुचाकी पार्क करून आंबिवली पश्चिमेकडे जात होते, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यांना रंगेहात पकडल्यानंतरही पोलिसांना त्यांच्या अटकेला विरोध करणाऱ्या आंबिवलीतील स्थानिक महिलांच्या तीव्र प्रतिकाराला सामोरे जावे लागले.

फिरोज नसीर शेख आणि जाफर युसूफ जाफरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही अनुक्रमे विठ्ठलवाडी आणि आंबिवली येथील रहिवासी आहेत. ते हिस्ट्री शीटर्स असून त्यांनी दोन डझनहून अधिक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांची नावे होती.

Exit mobile version