मुंबई बनतेय अमली पदार्थांची राजधानी? तीन वर्षांत मुंबई पोलिसांच्या कारवाईत वाढ

मुंबई बनतेय अमली पदार्थांची राजधानी? तीन वर्षांत मुंबई पोलिसांच्या कारवाईत वाढ

मागील ३ वर्षात १३१ कोटींचा ३४१४ किलो मुद्देमाल जप्त

मुंबई ही अंमली पदार्थांची राजधानी तर बनत नाही चालली ना? असा प्रश्न यासाठी उपस्थित होत आहे. कारण मागील ३ वर्षात मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत २०८ गुन्हे दाखल केले असून यात २९८ आरोपींना अटक केली आहे. मागील ३ वर्षात १३१ कोटींचा ३४१४ किलो मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे. मागील ३ वर्षात यावर्षी कारवाईत ७ पटीने वाढ झाली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे मागील ३ वर्षात अंमली पदार्थ आणि अन्य उत्तेजक पदार्थ अंतर्गत माहिती विचारली होती. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप काळे यांनी अनिल गलगली यांस प्रादेशिक विभागनिहाय माहिती उपलब्ध करुन दिली आहे. एकूण ५ युनिट कार्यरत असून यात दक्षिण प्रादेशिक विभाग- आझाद मैदान युनिट, मध्य प्रादेशिक विभाग- वरळी युनिट, पश्चिम प्रादेशिक विभाग- बांद्रा, पूर्व प्रादेशिक विभाग- घाटकोपर युनिट, उत्तर प्रादेशिक विभाग- कांदिवली युनिट अशी सरंचना आहे. अनिल गलगली यांस सन २०१९, सन २०२० व सन २०२१ ( दिनांक २०/१०/२०२१ पर्यंत) रोजी पर्यंत एनडीपीएस अंतर्गत केलेल्या कारवाईची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. या विविध अंमली पदार्थात गांजा, चरस, एमडी, कोकेन, एमडीएमए, कोडेइन, ओपीम,  एलएसडी पेपर्स, अल्परझोअम, नेत्रावेत टॅब्लेट याचा समावेश आहे.

सर्वाधिक मुद्देमाल २०२१ मध्ये जप्त

सन २०१९ आणि सन २०२० च्या तुलनेत सन २०२१ मध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष अधिक सक्रिय झाला असून २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत कारवाई ७ पटीने वाढली आहे. सन २०१९ मध्ये ३९४.३५ किलो मुद्देमाल जप्त केला असून यात १३४३ स्ट्रीप्स, ७५७७ बॉटल्स आणि १५५१ डॉट मिली ग्राम आहे. याची एकूण किंमत २५.२९ कोटी इतकी आहे. सन २०२० मध्ये ४२७.२७७, किलो मुद्देमाल जप्त केला असून यात ५१९१ बॉटल्स, ६६००० टॅब १४ डॉट मिली ग्राम आहे. याची एकूण किंमत २२.२४ कोटी इतकी आहे. तर २० ऑक्टोबर २०२१ च्या वर्षी २५९२.९३ किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि १५८३० बॉटल्स व १८९ एलएसडी पेपर्स सुद्धा आहे ज्याची किंमत ८३.१९ कोटी इतकी आहे.

सर्वाधिक गुन्हे आणि अटक आरोपी २०२१ मध्ये

अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सन २०१९ आणि सन २०२० च्या तुलनेत सन २०२१ मध्ये सर्वाधिक गुन्हे नोंद तर केलेच तसेच अटक आरोपी सुद्धा सर्वाधिक होते. २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण ९४ गुन्हे नोंद झाले ज्यात अटक आरोपींची संख्या १३७ आहे. सन २०१९ मध्ये ७० गुन्ह्यात १०३ आरोपींना अटक करण्यात आली तर सन २०२० मध्ये फक्त ४४ गुन्ह्याची नोंद झाली ज्यात आरोपी अटक संख्या ५८ होती.

 

हे ही वाचा:

‘जय भीम’ चित्रपटात प्रकाश राज यांनी मारलेल्या थपडेमुळे का रागावले लोक?

कांदळवन प्रतिष्ठानतर्फे पक्षी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

टीम इंडियाची आज अस्तित्वाची लढाई

अजित पवार लोकांना मूर्ख बनवणं बंद करा

 

अनिल गलगली यांच्या मते या कारवाईत अजून भर पडू शकते यासाठी स्थानिक पातळीवर गुन्ह्यात वाढ झाली तर त्या पोलीस ठाण्याच्या अधिकारी वर्गाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. कारण अंमली पदार्थ विरोधी कक्षाला माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कारवाईत वेळ जातो आणि काही वेळा आरोपी फरार होतात. यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती आणि धडक कारवाईची अपेक्षा आहे.

Exit mobile version