महाराष्ट्रात कोरोनाचा हैदोस सुरु असून, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. पण शासनाच्या या आदेशाला झुगारून मुंबईत जुगाराचे अड्डे चालवले जात असल्याचा प्रकार लोअर परळ येथे उघडकीस आला आहे.
राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची कार्यालये बंद आहेत. अशातच अवैध पद्धतीने सुरु असलेला एक जुगाराचा अड्डा लॉकडाऊनमध्येही सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली. इतकाच नव्हे तर लोक सर्रास या अड्ड्यावर जाऊन जुगार खेळात असल्याचेही त्यांना समजले. ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने त्यावर कारवाई केली.
हे ही वाचा:
वादग्रस्त पोलिस अधिकारी दया नायक यांची बदली
‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’
कोविड लसींना पेटंटच्या पिंजऱ्यातून सोडवण्यास अमेरिकेचा पाठिंबा
मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेने गुरुवारी दुपारी लोअर परळ येथे सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगारच्या अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान १२ जणांवर कारवाई करण्यात आली असून लाखो रुपये आणि जुगाराची सामुग्री जप्त करण्यात आली आहे. लोअर परळ येथील एका इमारतीत सोशल क्लबच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची माहिती समाज सेवा शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दुपारी छापा टाकण्यात आला. या छापेमारी दरम्यान पोलिसांनी जुगारचा अड्डा चालवणाऱ्यासह १२ जणांना ताब्यात घेतले आहे . या बाराही जणांविरुद्ध जुगार विरोधी कायदा अंतर्गत ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेतर्फे ही माहिती देण्यात आली.